पुणे : पुण्यात सध्या इमारत पुनर्विकासाचे म्हणजेच रीडेव्हलपमेंट वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे. इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांच्या मनात अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांना योग्य उत्तर न मिळाल्याने पुनर्विकासाच्या एकूण प्रक्रियेबाबतच रहिवासी साशंक होतात. त्यामुळे ही प्रक्रिया लांबत जाते. आता पुण्यातील नवउद्यमीने यावर कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून उपाय शोधून काढला आहे. यामुळे नागरिकांना इमारतीच्या पुनर्विकासाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सॲपवर मिळत आहेत.

एस.लक्ष्मीनारायण या नवउद्यमीने ही अभिनव सेवा सुरू केली आहे. लक्ष्मीनारायण यांना त्यांच्या गृहनिर्माण संस्थेची प्रक्रिया पार पाडताना आलेल्या अनुभवातून ही कल्पना सुचली. त्यातून त्यांनी ‘ड्रीम्स रीडेव्हलप्ड’ ही पुनर्विकास सल्लागार संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘रीडेव्हलपमेंटगुरु’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. इमारतीच्या पुनर्विकासाबाबतच्या प्रश्नांना कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने व्हॉट्सॲप आधारित उत्तरे देणारी ही सेवा आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवरून प्रश्न विचारल्यानंतर त्यांना तात्काळ प्रश्नाचे उत्तर मिळत आहे.

याबाबत लक्ष्मीनारायण म्हणाले की, गृहनिर्माण संस्थेसाठी पुनर्विकासाचा निर्णय हा अनेकदा आयुष्यात एकदाच घेतला जाणारा निर्णय असतो. मात्र विकासक दररोज अशा प्रकल्पांशी संबंधित काम करीत असतात. कायदेशीर, आर्थिक, वास्तुशास्त्रीय आणि नियामक बाबींची स्पष्ट माहिती मिळाल्यानंतरच सदस्यांना योग्य निर्णय घेता येतो. विश्वसनीय आणि पडताळता येणारी माहिती सोप्या व सहज उपलब्ध माध्यमातून थेट गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे ‘रीडेव्हलपमेंटगुरु’ आहे. यावर येणारे नागरिकांचे प्रश्न हे प्रामुख्याने आपल्याला मिळणाऱ्या घराचा आकार आणि ते कधी ताब्यात मिळेल, याबाबत आहेत.

नेमकी माहिती कशाची?

‘रीडेव्हलपमेंट गुरु’ची रचना ज्येष्ठ नागरिक आणि आयुष्यभराच्या मालमत्तेतील मोठा हिस्सा येथील घरामध्ये गुंतवलला गेला आहे, अशा सदस्यांचा विचार करून करण्यात आली आहे. सदस्य पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न थेट व्हॉट्सॲपवर विचारू शकतात. त्यांना महारेरा नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभागाकडील मालकी हक्काचा इतिहास तसेच संबंधित नियमावली यासारख्या पडताळता येणाऱ्या स्रोतांशी जोडलेली उत्तरे मिळतील. विकासक, गृहनिर्माण संस्था तसेच वास्तुविशारद, कायदे विषयक व पुनर्विकास तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करताना कोणते प्रश्न विचारावेत, याबाबतही व्हॉट्सॲपवर आधारित सेवा मार्गदर्शन करते.

वापर कसा करावा?

  • पुनर्विकासासंदर्भातील प्रश्नांसाठी व्हॉट्सॲपवर ‘Guru’ लिहा
  • व्हॉट्सॲप क्रमांक ९६९९६५३५९२ वर संदेश पाठवा.
  • व्हॉट्सॲपवरच प्रश्नाचे तातडीने उत्तर मिळेल.