इंदापूर : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरमधील लोणी-देवकरजवळ जीपचा टायर फुटल्याने मालमोटारीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जीप चालक प्रमोद खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर ), विजयसिंह कमलसिंह राजपूत (वय ३५, त्रिलोकनगर,मध्य प्रदेश) आणि शशांक उमेश कोटिया (वय ३२, रा.गौतमनगर, गिरड ग्वालियर, मध्य प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीप पुण्याच्या दिशेने जात असताना टायर फुटल्याने जीप दुभाजक तोडून सोलापूरकडे जाणाऱ्या मालमोटारीला धडकली. त्यामध्ये चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मृत्युमुखी पडलेले तिघेही लोणी देवकर एमआयडीसीमधील खासगी कंपनीतील कर्मचारी आहेत.
इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर राऊत तपास करत आहेत.
