पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी उन्नत महामार्ग उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. हा लांबीच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उन्नत महामार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे मांजरी फाटा, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरूळी कांचन येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते यवतदरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणासह उन्नत महामार्ग उभारण्यात येणार आहे. हा सध्या चौपदरी महामार्ग आहे. हा मार्ग सहापदरी केला जाणार असून, त्यावर सहापदरी उन्नत महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा उन्नत महामार्ग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा सहापदरी उन्नत महामार्ग असेल. या महामार्गाची लांबी ३१.५० किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी ४७.२५ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची आवश्यकता असेल. या प्रकल्पामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. या महामार्गावर मांजरी फाटा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर आणि थेऊर फाटा आणि उरूळी कांचन ही कोंडीची अनेक ठिकाणे आहेत. या प्रकल्पामुळे येथील कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
या महामार्गाची क्षमता प्रतिदिन ३० हजार प्रवासी वाहने आहे. या महामार्गावरील सध्याची वाहतूक प्रतिदिन ४३ हजार ६४० प्रवासी वाहन आहे. भविष्यात या महामार्गाची क्षमता १ लाख ६ हजार प्रवासी वाहनांवर जाणार आहे. या प्रकल्पात हडपसर ते सहजपूरवाडी असा २५ किलोमीटर उन्नत सहापदरी महामार्ग असेल. याचबरोबर हडपसर ते यवत असा ३१.५० किलोमीटर सहापदरी जमिनीवरील महामार्ग असेल. याचबरोबर हडपसर ते बाह्य वर्तुळाकार मार्ग ही १७.६७ किलोमीटरची मेट्रो मार्गिका असेल.
प्रकल्पाची वैशिष्टे
- हडपसर ते यवत -सहापदरी उन्नत महामार्ग
- एकूण लांबी – ३१.५० किलोमीटर
- उन्नत सहापदरी महामार्ग – २५ किलोमीटर
- एकूण खर्च – ५ हजार २६२ कोटी रुपये
देशातील सर्वांत मोठे उन्नत महामार्ग
पुण्याच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. यातून केवळ वाहनचालकांचा वेळ वाया जात नाही, तर त्याचा गंभीर आर्थिक परिणाम पुण्याच्या विकासावर होत आहे. नवीन प्रकल्पांमुळे पुण्याच्या परिसरातील कोंडी सुटून आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. यामुळे गुंतवणुकीच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. देशातील सर्वाधिक लांबीचा पहिला आणि दुसरा सहापदरी उन्नत महामार्ग पुण्यात उभारण्यात येणार आहे. त्यात पुणे ते शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग आणि हडपसर ते यवत उन्नत मार्गाचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
