पुणे : पुणे विभागातील नगरपरिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकांमधील पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ तसेच अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ अशा एकूण ४० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्यामुळे त्यांच्यावर तीन वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयाना देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागातील एकूण ६० नगरपरिषदा, नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५, ६ महानगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक १४ जानेवारी रोजी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या पुणे महानगरपालिकेच्या २२, पंढरपूर नगरपरिषदेच्या १५ आणि अक्कलकोट नगरपरिषदेच्या ३ उमेदवारांनी अनुक्रमे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १० (१ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार विहित मुदतीत (३० दिवस) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नव्हता.

पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या प्रस्तावानुसार संबंधितांना ५ आणि २५ मे रोजी सुनावणीसाठी बोलविण्यात आले. सुनावणीदरम्यान संबंधित उमेदवारांकडून समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याबद्दल आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.