पुणे : दहीहंडी, गणेशोत्सव आणि डीजे हा विषय सध्या गाजत असताना ‘ध्वनिमर्यादेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत, पण ‘साउंड सिस्टीम’वर बंदी घालून किंवा निर्बंध लादून आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका,’ अशी मागणी पुणे जिल्हा साउंड, लाइट, जनरेटर ओनर्स असोसिएशनने बुधवारी केली.

असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडताना ‘सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर समान नियम लागू करावेत,’ अशी मागणी केली. असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, सल्लागार मोहित पालेशा आणि रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे गजेंद्र प्रकाश मोरे उपस्थित होते.

‘आवाज वाढवायला सांगणार नाही, असे लेखी देणाऱ्या गणेश मंडळांसाठी आम्ही काम करणार आहाेत. मात्र, दहीहंडीपर्यंत आमच्याविरोधात जाणारे नियम लागू केले, तर मात्र आम्हाला महाराष्ट्रभरातून मोर्चा काढावा लागेल,’ असा इशाराही असोसिएशनच्या वतीने देण्यात आला. काळभोर म्हणाले, ‘प्लाझ्मा, ध्वनिक्षेपकांच्या भिंती, दोन मंडळांमध्ये समोरासमोर आल्यावर होणारी स्पर्धा यांमुळे गणेशोत्सवादरम्यान डीजेचा आवाज प्रमाणाबाहेर वाढतो. याचा सामान्य नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना त्रास होतो हे आम्हालाही मान्य आहे.

त्यासाठी आम्ही न्यायालयाच्या नियमांमध्ये साउंड सिस्टीम चालवणार आहोत. मात्र, उत्सवादरम्यान ध्वनी पूर्णपणे बंद करणे हा आमच्या व्यवसायावर अन्याय आहे. या व्यवसायावर आधारित उपजीविका असणारे शेकडो लोक पुण्यात आहेत. व्यावसायिकांचा दर वर्षी २० ते २५ लाखांचा आर्थिक व्यवहार होत होता. परंतु यंदा २५-५० हजार रुपये मिळणेही अवघड झाले आहे.’

‘दहीहंडी, गणेशोत्सव हाच वर्षभरातील आमचा मुख्य व्यवसायाचा कालावधी असतो. ध्वनियंत्रणेसाठी केवळ चार टॉप आणि चार बेस हा निर्णय, त्याचप्रमाणे लेझर लाइट, प्रेशर मीडला घातलेली बंदी आम्हाला मान्य आहे. कर्णकर्कश आवाज बंद करण्यासही आमचे समर्थन आहे. उत्सव हा सगळ्यांचा असून, मिरवणुकीतील ध्वनिव्यवस्थेवरील बंदी आणि निर्बंधांबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी आम्ही करतो. अशाप्रकारे व्यावसायिकांची गळचेपी केल्यास साउंड आणि डीजेच्या समर्थनासाठी पुण्यात गणेश मंडळ कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला जाईल,’ असे गजेंद्र मोरे म्हणाले.

साउंडचा व्यवसाय हा आम्ही जोडधंदा म्हणून करतो. पण अशाप्रकारे आमचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. राज्यातील साउंड सिस्टीमला कमी मागणी असून, इतर राज्यांतील साउंड सिस्टीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे स्थानिक रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे. गणेश मंडळांनी महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतून साउंड सिस्टीम मागवू नये. यंदा मिरवणुकीत अश्लील गाणी न वाजवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. डीजेबंदीमुळे प्रशासन दर वर्षी नियमात बदल करते आणि आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे एकदाच याबाबत प्रशासनाने नियमावली करावी. – सागर सुतार, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा साउंड, लाइट, जनरेटर ओनर्स असोसिएशन