सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या सनसिटी-कर्वेनगर नदीवरील पुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या उड्डाणपुलासाठी महापालिकेने ३७ कोटींच्या खर्चाचा आराखडा केला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. येत्या दोन वर्षात उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्ता आणि कर्वेनगरमधील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल प्रस्तावित आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती. महापालिका प्रशासनाने आता ही प्रक्रिया सुरू केल्याने उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर ही दोन उपनगरे काही मिनिटात एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

जोड रस्त्यासह ३५० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल असून त्याचे काम चोवीस महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड आणि कर्वेनगर या दरदम्याच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरणार आहे. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा खासगी असल्याने भूसंपादन रखडले होते. मात्र खासगी जागा मालकांनी जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानसुार सध्या ९५ टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरीत जागेचे भूसंपादन करण्यासाठी साडेसात कोटींची तरतूद महापालिकेने केली आहे. या खर्चालाही महापालिकेने मान्यता दिली आहे. बहुतांश जागा ताब्यात आल्याने महापालिकेने कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविली असून येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड आणि कोथरूड आणि कर्वेनगर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूडचे आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली होती. उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी तातडीने निविदा प्रक्रिया राबिवण्याची ग्वाही आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान दुहेरी उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. गंगाभागोदय ते संतोष हॅाल चौक या दरम्यान उड्डाणपुलासाठी खांब उभारण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र उड्डाणपुलामुळे या भागात सध्या वाहतूक कोंडी होत असून सनसिटी-कर्वेनगर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यास वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने काम सुरू करण्यापूर्वी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना कराव्यात आणि सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गांची उभारणी तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune speeding up work on suncity karvenagar flyover pune print news amy
First published on: 15-08-2022 at 10:51 IST