पुणे : कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या असताना शिकण्याच्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली. कचरावेचकांची मुले, रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये उत्तम गुण मिळवून आयुष्याच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ केला. या निमित्ताने शिक्षण सुटलेल्या मातांनी पुन्हा शिक्षणात टाकलेले पाऊल, पदोन्नती मिळविण्याची प्रेरणा, मुलांना शिकवतानाच आईच्या हाती आलेले पुस्तक अशा कहाण्या सुफळ संपूर्ण झाल्या आहेत.
पूना नाइट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावीचा निकाल ८६.३६ टक्के लागला. वडार वस्तीत राहणारा प्रवीण पुणे महापालिकेत कचरा संकलनाचे काम करतो. शिक्षणात वीस वर्षांचा खंड पडलेला असताना पदोन्नती मिळविण्यासाठी त्याने पुन्हा शिक्षण घेण्याचे ठरवले. रात्रशाळेत प्रवेश घेऊन दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. प्रवीणने ६८.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेत द्वितीय क्रमांक मिळवला. धनश्री बोर्ले यांनी लग्नानंतर १८ वर्षांनी पुस्तक हाती घेतले. दहावी उत्तीर्ण नसल्याने नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी पुन्हा शिकायचे ठरवून रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन दहावीत ६२.८० टक्के गुण मिळवले. दहावी उत्तीर्ण झाल्याने आता त्यांचा पुढील शिक्षणासह नोकरी मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उषा लोखंडे यांना ८० टक्के अपंगत्व असल्याने अनेक शाळांनी प्रवेश नाकारला. मात्र, त्यांनी जिद्दीने शिकून दहावीत ५० टक्के गुण प्राप्त केले. शारीरिक मर्यादा असूनही त्यांचा भाऊ राहुल त्यांना दररोज शाळेत घेऊन येत असे. त्यांची शाळेतील १०० टक्के उपस्थिती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरली. आता अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू ठेवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रात्रशाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाला समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक, प्राचार्य सतीश वाघमारे, महेश पिसाळ, महालिंग कुलाळ, नीलेश साबणे यांनी कौतुक केले.
शहरातील कचरावेचकांच्या मुला-मुलींनी जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या निकालात यश मिळवले. पालकांच्या कामाला मदतीचा हात देतानाच अभ्यास करून मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. ‘स्वच्छ’ संस्था आणि ‘कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली यंदा एकूण १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १०९ मुलगे आणि ९० मुलींचा समावेश होता. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी संघटनेने वर्षभर शिष्यवृत्ती, मोफत शिकवणी आणि शैक्षणिक साहित्याची मदत केली.
पाटील इस्टेट येथील एकल माता कावेरी खुपटे यांची मुलगी खुशी खुपटे हिने स्वयंअध्ययनाच्या जोरावर ८९ टक्के गुण मिळवले. मुलाच्या भविष्यासाठी पुण्यात स्थलांतरित झालेल्या मेश्राम कुटुंबातील सार्थक मेश्राम याने ८६.६० टक्के, दिव्या शिरसाठ हिने ७५ टक्के गुण मिळवले. वानवडी भागात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या अर्चना घोडके (६० टक्के) आणि त्यांचा मुलगा यश घोडके (५४ टक्के) या दोघांनी यंदा एकत्र दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. २५ वर्षांपूर्वी शिक्षण सुटलेल्या अर्चना यांनी मुलाला शिकवताना स्वतः पुस्तक हातात घेतले. रात्रशाळेत शिकून मुलापेक्षा जास्त गुण मिळविले. तसेच, वर्षा ओव्हाळ (४६ टक्के) आणि ज्योती पंडित (४१ टक्के) या महिला कचरावेचकांनीही अनेक वर्षांच्या खंडानंतर जिद्दीने दहावीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. विशेष म्हणजे, ज्योती पंडित यांची मुलगी भारतीय नौसेनेत कार्यरत असून, तिच्याच प्रेरणेतून ज्योती यांनी दहावीत यश मिळवले.
घरची परिस्थिती आणि वडिलांच्या व्यसनामुळे २६ वर्षांपूर्वी शिक्षण सुटलेल्या राजेश्वरी भोसले यांनी शिकण्याची इच्छा जिवंत ठेवली. एकल माता म्हणून मुलाचा सांभाळ करत, दिवसा नोकरी करत पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात पाऊल ठेवले. रात्रशाळेत प्रवेश घेऊन त्यांनी दहावीच्या परीक्षेत ७४.२० टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, यंदाच त्यांचा मुलगाही दहावीला होता. त्याला ७४ टक्के गुण मिळाले असून, गुण मिळविण्यात मुलापेक्षा आईची टक्केवारी सरस ठरली.
