scorecardresearch

पुणे : भुयारी मार्ग सुरू करा अन्यथा विमानसेवा द्या; मेट्रोच्या खांबांवर उपरोधिक फलक

तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कामे अपूर्णच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये रोष

मेट्रो संबंधित कामासाठी रामवाडी येथील भुयारी मार्ग वाहनचालक आणि नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने, वाहनचालकांना पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही कामे अपूर्णच असल्याने स्थानिक नागरिकांनी मेट्रोच्या खांबांवर उपरोधिक फलक लावत रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांची, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी विमानसेवा द्यावी, अशी मागणी फलकांद्वारे करण्यात आली आहे.

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत रामवाडी येथे गेल्या वर्षभरापासून मेट्रोचे काम सुरू आहे. कामासाठी भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता बंद करण्यात आला आहे.

सेंट जोसेफ कॉलनी, कल्याणीनगर, कोरेगांव पार्क, हरिनगर आणि आदर्शनगर भागातील स्थानिक नागरिकांना रामवाडी आणि नगर रस्ता येथे येण्यासाठी तीन ते चार किलोमीटर तर रामवाडी आणि विमाननगर भागातील नागरिकांना कोरेगांव पार्क आणि कल्याणीनगर येथे येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर लांबीचा वळसा घालावा लागत आहे.

वर्षभरापासून नागरिकांनी गैरसोय सहन केली. भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता बंद असल्याने रामवाडी परिसरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. महामेट्रोकडून या भागात वॉर्डनची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील त्रस्त नागरिकांनी रामवाडी भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता तातडीने सुरू करा किंवा जोपर्यंत तो सुरू होत नाही तोपर्यंत विमानसेवा सुरू करा, अशी मागणी करणारे फलक मेट्रोच्या खांबांवर लावले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तांत्रिक समस्यांचे कारण देत काम पूर्ण करण्याची १५ मार्च रोजीची अंतिम मुदत पुढे ढकलली आहे. मेट्रोचे खांब उभारताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिसरातील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता खुला केला जाईल, असा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune start subway otherwise provide airline boards on metro poles pune print news msr