डेंग्यू रुग्णसंख्येत पुणे राज्यात तिसऱ्या क्रमांकावर!

डेंग्यूच्या प्रादुर्भावात राज्यात पुणे शहराचा या वर्षी तिसरा क्रमांक लागला आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील डेंग्यू प्रादुर्भावात पिंपरी-चिंचवड पुण्याला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर गेले आहे.

डेंग्यूच्या प्रादुर्भावात राज्यात पुणे शहराचा या वर्षी तिसरा क्रमांक लागला आहे. तर राज्याच्या ग्रामीण भागातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पुणे जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे शहरी भागातील डेंग्यू प्रादुर्भावात पिंपरी-चिंचवड पुण्याला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर गेले आहे.
राज्याच्या आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी ही माहिती दिली. या वर्षी आतापर्यंत राज्याच्या शहरी भागात डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजे १७८ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यात डेंग्यूचे प्रत्येकी ५९ रुग्ण आढळले आहेत. तर ५८ रुग्णांसह पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागाची आकडेवारी पाहता डेंग्यूच्या तब्बल ३५४ रुग्णांसह चंद्रपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्हय़ात डेंग्यूचे ३४ रुग्ण आढळले असून, राज्यात जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत राज्यात डेंग्यूच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला असून यातही पुण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
२०१२ मध्ये पुण्याच्या ग्रामीण व शहरी भागात मिळून डेंग्यूचे ८३३ रुग्ण आढळले होते. यापैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१३ मध्येही डेंग्यूच्या रुग्णांची एकत्रित संख्या ८३३ अशी कायम राहिली, तर ९ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.   
शालेय विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य खात्याने या वर्षी विशेष मोहीम राबवली असून ती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू आहे. डॉ. जगताप म्हणाल्या, ‘‘या मोहिमेत आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना डेंग्यूचा एडिस इजिप्ती डास कसा दिसतो, डेंग्यूची लक्षणे काय, प्रतिबंधासाठी काय करावे अशा गोष्टी सांगण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये १५ जून ते १५ जुलै या कालावधीत मोहीम राबवण्यात आली असून, काही शाळांमध्ये ती अजूनही सुरू आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातील ६०० शाळांचा यात समावेश आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune stood 3rd in maharashtra for dengue patients