पुणे : शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्याबरोबरच रेबीजचा धोका कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ३५ हजार ६०३ श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर १ लाख ५८ हजार २७४ श्वानांचे लसीकरण करण्यात आले.

महापालिकेच्या अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १३ हजार १४८ नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. २०२२-२३ मध्ये ९ हजार ४०, तर २०२३-२४ मध्ये ६४ हजार ७३० श्वानांपर्यंत नसबंदी व लसीकरणाच्या माध्यमातून पोहोच नोंदविण्यात आली. २०२५-२६ मध्ये ६१ हजार ४५४ नसबंदी शस्त्रक्रिया आणि १ लाख ६५ हजार ९२४ लसीकरणाची नोंद आहे. २०२६-२७ मध्ये सप्टेंबरअखेर १ लाख ९३ हजार ८७७ श्वानांपर्यंत नसबंदी व लसीकरणाच्या माध्यमातून पोहोचल्याची आकडेवारी आहे. मात्र, या आकडेवारीतील नसबंदी आणि लसीकरणाचे घटक स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक आहे.

भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी, तर रेबीजचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही मोहिमांचा नियमित आढावा, क्षेत्रीय कार्यालयनिहाय उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष प्रगती यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

सिंहगड रस्ता आघाडीवर

क्षेत्रीय कार्यालयनिहाय ताज्या आकडेवारीत सिंहगड रस्ता येथे १११, डी. पी. रस्ता येथे १०४, औंध-बाणेर आणि हडपसर-मांजरी येथे प्रत्येकी ९७, कोंढवा-उंड्री येथे ९३, घोले रस्ता-शिवाजीनगर येथे ८४ आणि नगर रस्ता-वडगावशेरी येथे ८० श्वानांचे लसीकरण झाले आहे. वानवडी-रामटेकडी येथे ७३, येरवडा-संगमवाडी-विमाननगर येथे ६७, बिबवेवाडी येथे ६२, कोथरूड-बावधन येथे ५६, धनकवडी-आंबेगाव येथे ५२, विश्रामबागवाडा येथे ४३ आणि वारजे-कर्वेनगर येथे ४० श्वानांचे लसीकरण झाले आहे. कसबा पेठेतील ७७ श्वानांच्या लसीकरणाची नोंदही उपलब्ध आहे.