पुणे : युद्धामुळे आखाती देशांमध्ये पुण्यातील ८० विद्यार्थी, ५ शिक्षक, काही नागरिक, पर्यटक अडकले आहेत. त्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे पुण्यातील खासदारांनी साकडे घातले आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. अडकलेल्या ५० पर्यटकांची सोय दुबईतील एका हॉटेलमध्ये केल्याची माहिती पर्यटन कंपनीने दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले इंदिरा विद्यापीठाचे ८० विद्यार्थी आणि ५ शिक्षक दुबईमध्येच अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असून, पालकांनी घाबरून जाऊ नये,’ असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले.

आखाती देशांकडे जाणारी विमाने रद्द

पुण्यातून आखाती देशांमध्ये जाणारी हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रात्री साडेआठ वाजता पुण्याहून दुबईला जाणारे आणि पहाटे ४.५५ वाजता दुबईवरून पुण्याला येणारे स्पाईसजेट कंपनीचे विमान रद्द करण्यात आले आहे. ‘इंडिगो’ने दुबई–पुणे–दुबई विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे कळवले आहे.

आमच्या कंपनीकडून अबुधाबी आणि दुबईमध्ये गेलेले ५० पर्यटक अडकले आहेत. सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये या सर्वांची सोय केली आहे. विमान वाहतूक सुरू होण्याची सर्वच जण वाट पाहत आहेत.- अखिलेश जोशी, संचालक, गिरीकंद ट्रव्हल्स