पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि सणसवाडी (ता. शिरूर) नालंदा बुद्ध विहाराचे संस्थापक सुदामराव उर्फ आबा शंकर पवार (वय ९३) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. पवार यांच्या पार्थिवावर सणसवाडी शिरूर येथे दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुदामराव पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात काही दिवस त्यांनी काम केले होते. १९५६ मध्ये नागपूर येथे झालेल्या बौद्ध धर्मांतर ऐतिहासिक सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी गावोगावी जाऊन बौद्ध धर्मांतराची चळवळ व्यापक केली. संपूर्ण हयातभर ते आंबेडकरी चळवळीला अनुकूल काम करत राहिले. त्यांचा सामाजिक कामाचा व्याप मोठा होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते काही काळ संचालक होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रयत शिक्षण संस्थेला सणसवाडी या ठिकाणी दोन एकर जमीन तसेच शासनाकडून एक कोटी रुपये त्यांनी मिळवून दिले होते. थायलंडच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी शंभराहून अधिक बुद्धाच्या मोठ्या मुर्त्या उपलब्ध करून ठिकठिकाणी बुद्ध विहारांमध्ये त्याचे वितरण केले. चास कमान प्रकल्पाच्या धरणग्रस्तासाठी त्यांनी लढा दिला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून धरणग्रस्ताचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.