पुणे : गेले महिनाभर तेजीत असलेल्या साखर, गुळाच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गौरी-गणपतीत साखर, गुळाला मागणी वाढणार आहे. साखरेच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी, तसेच गुळाच्या दरात आठ ते दहा रुपयांनी रुपयांनी घट झाली आहे.

जुलै महिन्यापासून साखरेच्या दरात टप्याटप्याने वाढ होत गेली. पावसाने ओढ दिल्याने ऊस लागवडीवर परिणाम झाला. लागवड लांबल्याने साखर कारखाने उशीरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साखरेचा नवीन हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे साखरेच्या दरात महिनाभरात तेजी निर्माण झाली. ‘जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४४ रुपये किलो रुपये साखर होती. साखरेच्या दरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो साखरेचे दर ७० ते ७५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. गणेशोत्सवात साखरेच्या मागणीत वाढ होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत साखरेचे दर तेजीत राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. साखरेच्या दरात महिनाभरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकही हवालदिल झाले होते,’ असे भवानी पेठ भुसार बाजारातील साखर व्यापारी विजय गुजराती यांनी नमूद केले.

‘साखरेच्या दरात वाढ झाल्याने केंद्र शासनाने परदेशातून दहा लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे साखरेपाठोपाठ गुळाच्या दरात घट झाली. गौरी-गणपतीत साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ होणार आहे. साखरेच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे,’ असे गुजराती यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील गूळ व्यापारी जवाहराल बोथरा म्हणाले, ‘राखी पौर्णिमेला गुळाला मागणी होती. साखरेपाठोपाठ गुळाच्या दरात किलोमागे ८ ते १० रुपयांनी घट झाली. गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीत गुळाला मागणी राहणार आहे.’

साखरेच्या दरात महिनाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटले. केंद्र शासनाने दहा लाख टन साखर परदेशातून आयात करण्याचा निर्णय नुकताच घेतला. केंद्र शासनाने व्यापारी, साखर प्रक्रिया उद्योगांकडील साठ्याची नियमित तपासणी करुन या बाबतची माहिती ऑनलाइन मागविण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या धोरणामुळे साखरेच्या दरात घट झाली आहे. – विजय गुजराती, साखर व्यापारी, भुसार बाजार, भवानी पेठ

साखर आणि गुळाच्या बाजारातील चढ-उतारांचा परिणाम दरांवर होतो. गेल्या २५ वर्षांत प्रथमच साखर आणि गुळाच्या दरात तेजी निर्माण झाली. साखर आयात करण्याचा निर्णयानंतर गुळाच्या दरात घट झाली. – जवाहरलाल बोथरा, गूळ व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार

साखर आणि गुळाचे दर

  • साखर क्विंटल – ५५०० ते ६००० रुपये
  • साखरेचे किलोचे दर (किरकोळ बाजार) – ५८ ते ६० रुपये
  • गुळाचे किलोचे दर (किरकोळ बाजार) – ६५ ते ७० रुपये
  • गूळ एक नंबर (क्विंटल) – ५९०० ते ६२०० रुपये
  • गूळ दाेन नंबर (क्विंटल) – ५३०० ते ५५०० रुपये

गूळ बाॅक्स पॅकिंग – ५५०० ते ६८०० रुपये