पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही शहरात उन्हाळी क्रीडा शिबिरांचे पीक जोमाने फोफावले आहे. करिअरचा मार्ग म्हणून याकडे बघण्याचा वाढणारा कल हे अलीकडचे निरीक्षण. पण, त्यामुळे खेळाचा आनंद मागे पडून त्याचेही ओझे होत चालल्याची भावना मुलांमध्ये रुजणे ही त्यातील गंभीर बाबही अधोरेखित होत आहे.
दर उन्हाळ्याच्या सुटीत पुण्यातील विविध मैदानांवर उन्हाळी शिबिरांची रेलचेल पाहायला मिळते. पूर्वी काही ठरावीक मैदानांपुरती असलेली शिबिरे आता कानाकोपऱ्यांत विस्तारली. शिवाय, क्रिकेटपुरता मर्यादित असणारा उन्हाळी शिबिरांचा घेराही विस्तारून बॅडमिंटन, टेबल टेनिस, पिकल बॉल, बास्केटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांना स्पर्श करतो आहे. अर्थात, सर्वाधिक पसंती क्रिकेटच्या शिबिरांनाच आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विविध क्रीडा प्रकारांत मिळत असलेल्या पदकांमुळे त्या त्या खेळाचे आकर्षण वाढते आहे. तसेच क्रिकेटच्या जोडीने बॅडमिंटन, टेनिस, कबड्डी आदी विविध खेळांच्या साखळी स्पर्धा सुरू झाल्याने तेथे खेळाडू किंवा प्रशिक्षक, सहायक, स्कोअरर, विश्लेषक, प्रसिद्धी अधिकारी म्हणून मिळू शकणाऱ्या संधी वाढल्याचे प्रतिबिंबही क्रीडा शिबिरांतील गर्दीत पडताना दिसते.
डेक्कन जिमखाना क्लब, पीवायसी जिमखाना, महाराष्ट्रीय मंडळ मैदान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पूना क्लब, नेहरू स्टेडिअम, सणस मैदान आदी मैदानांबरोबरच उपनगरांमधील खासगी टर्फपर्यंत जिकडेतिकडे बॅट, चेंडू आणि क्रिकेटला लागणारी इतर आयुधे परिधान करून बच्चे कंपनी क्रिकेटचा सराव करताना दिसतात. नेहरू स्टेडिअमच्या मैदानावर दर वर्षी १६ खेळपट्ट्यांवर शिबिरांचा सराव चालतो. यंदा डागडुजीमुळे त्यातील दहाच सुरू आहेत. जवळपास ४०० मुले रोज सराव करतात. महिलांनी विश्वविजेतेपद मिळविल्याने यात मुलींचा समावेशही उल्लेखनीय आहे.
क्रिकेटपाठोपाठ मुलांची पसंती जलतरणाला आहे. महापालिकेच्या २३ तरण तलावांवर सध्या उन्हाळी शिबिरे सुरू आहेत. अनेक खासगी तलावांवरही पोहण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. एका तलावावर दररोज साधारण ५० ते ६० मुले पोहायला शिकतात.
पूर्वी मराठी शाळांना एप्रिल-मे अशी सुटी असायची. त्यामुळे तब्बल दोन महिने शिबिरे चालायची. मात्र, आता मराठी माध्यमाच्या शाळादेखील एप्रिलअखेरपर्यंत सुरू असतात. त्यामुळे उन्हाळी शिबिरांचा कालावधी कमी झाला आहे. तरी, पूर्ण मे महिना या शिबिरांमध्ये मुलांची लगबग असते.
कोट्यवधींची उलाढाल
उन्हाळी शिबिरांमुळे अर्थकारणालाही मोठी गती मिळत आहे. शहर आणि उपनगरांत मिळून ३०० ते ४०० क्रीडा शिबिरे सध्या सुरू आहेत. मे महिन्यासाठी त्यांचे शुल्क एक-दीड हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंतच्या घरात आहे. शहरात सुमारे १५ हजार मुले विविध शिबिरांत जातात. शुल्काव्यतिरिक्त साधनांचा खर्चही धरला, तर एकाच महिन्यात विविध क्रीडा शिबिरांतून शहरात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे क्रीडा प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले.
मुलांपेक्षा पालकच आतुर
‘आपल्या देशात क्रिकेटइतका कुठलाच खेळ लोकप्रिय नाही. त्यामुळे उन्हाळी शिबिरांमध्ये सर्वाधिक मुले क्रिकेटला पसंती देतात. मात्र, मुलांबरोबरच त्यांचे पालकही यासाठी खूप आतुर असतात. उन्हाळी शिबिरात सराव झाल्यानंतर पालकांना आपला पाल्य आयपीएल अथवा भारतीय संघात कधी खेळेल, याची उत्सुकता असते. पण, या खेळाला वर्षानुवर्षे सराव लागतो, हेही आम्हाला या शिबिराच्या माध्यमातून पालकांना सांगावे लागते,’ असे निरीक्षण क्रिकेट प्रशिक्षक देवदत्त नातू यांनी नोंदवले.
‘शिबिरांमधून आनंदही घ्यावा’
‘गेल्या काही वर्षांत केवळ क्रिकेटच नाही, तर आता मैदानी खेळांकडेही मुले वळत आहेत. याचे एक कारण म्हणजे या क्रीडा प्रकारांत देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चांगली पदके मिळत आहेत. क्रीडा क्षेत्रातही करिअर घडत असल्याने पालकही मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. असे असले, तरी मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच आता खेळाचेही ओझे जाणवत आहे. मुलांना आनंद मिळावा यासाठी खेळ खेळावा, ही भावना असावी. पण, तसे होताना दिसत नाही. हा आनंद अलीकडे हरवत चालला आहे,’ असे मत क्रीडा प्रशिक्षक हर्षल निकम यांनी मांडले.
क्रीडा शिबिरे उत्पन्नाचा चांगला स्रोत बनला असून, या माध्यमातून अनेक होतकरू प्रशिक्षकांना अर्थार्जन होताना दिसते. त्यामुळे क्रीडा शिबिरे क्रीडा क्षेत्रातील अर्थकारणालाही गतिमान करत आहेत. – भूपेंद्र आचरेकर, क्रीडा प्रशिक्षक, जलतरण
पाल्याला कुठल्या खेळात गती असू शकते, हे प्रथमदर्शनी पालकांना क्रीडा शिबिरांमधून कळते. त्यानंतर मुले खेळात कारकीर्द घडवू शकतात. पालकांची भूमिका फक्त प्रोत्साहन देण्याची असून, शिक्षणाबरोबरच खेळही कारकिर्दीचा एक चांगला पर्याय बनू शकतो, असे वाटते.- स्वाती बनकर, पालक
