राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) पुरवणी वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार असून, आतापर्यंत ७०.३९ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी: सांगवीत सातव्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप

डीव्हीईटीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून प्रवेशांसाठी १ लाख ५० हजार ११६ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी १ लाख ५ हजार ६७२ जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी ७ ते ११ सप्टेंबरची मुदत आहे. शासकीय आणि खासगी आयटीआयमधील जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. ११ सप्टेंबरला प्रवेश फेरीसाठीच्या उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. १२ सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपस्थित विद्यार्थ्यांतून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशासाठी बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.