पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क परिसरात अनेक ठिकाणी नाल्यांवर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे विस्कळीतपणा आला असून नागरी समस्यांमध्ये वाढ झाली. याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) जबाबदार आहे. पुढील २० दिवसात म्हणजेच २५ जुलैपर्यंत हिंजवडीतील परिस्थिती सुधारली नाही, तर २६ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
हिंजवडीतील समस्यांवर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली, पत्रही दिले. पण, आठवड्याला पुण्यात येणाऱ्या फडणवीस यांनी अद्यापही वेळ दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंजवडीतील नागरी समस्यांची खासदार सुळे यांनी शुक्रवारी पाहणी केली.
सकाळी साडेआठ वाजल्यापासून टप्पा एक, दोन, तीन, माणगाव, मारुंजी रस्ता, मेट्रो कारशेड जवळील रस्ता, भोईरवाडी या ठिकाणच्या रस्त्याची त्यांनी पाहणी केली. अभियंते, नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या. पाहणीनंतर हिंजवडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘जागतिक पातळीवरील करोडे रुपयांचे व्यवहार हिंजवडीत होतात. सर्वाधिक महसूल येथून जातो. येथील समस्या हा राजकीय प्रश्न नाही’ असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, ‘या परिसरात मागील पाच वर्षांत प्रचंड बांधकामे झाली. काही बांधकामे नैसर्गिक नाल्यांवर झाली आहेत. त्यामुळे येथे विस्कळीतपणा आला. परिणामी, समस्या वाढल्या. त्यासाठी तातडीने नालेसफाई, मेट्रोच्या कामाचा राडारोडा हटवावा.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शाळांच्या वेळेत काही बदल करता येईल का, याची चाचपणी करावी. जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. परंतु, फडणवीस यांच्याकडून वेळ मिळत नसल्याचा आरोप सुळे यांनी केला.
रस्त्यांसाठी ८० टक्के जागेचे भूसंपादन झाले असून २० टक्के बाकी आहे. पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होईल. एका वर्षाच्या आत सर्व रस्ते होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्योगमंत्र्यांसोबत ८ जुलै रोजी बैठक होणार असल्याचे’ त्यांनी सांगितले. पूर्वी महिन्यातून एकवेळा येथे येत होते. या नागरी समस्या, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत महिन्यातून दोनवेळा येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
हिंजवडीबाबत संयुक्तिक वाटेल तो निर्णय घ्यावा
‘हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. महापालिकेतील समावेशाबाबत नागरिकांचे मत महत्त्वाचे आहे. हिंजवडीला महापालिकेत समाविष्ट करावे किंवा हिंजवडी-माणची स्वतंत्र यंत्रणा करण्याबाबतचा पर्याय निवडावा. लोकांच्या मागणीनुसार शासनाने संयुक्तिक वाटेल तो निर्णय घ्यावा. हिंजवडी, माणमधील प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेणारी स्वतंत्र यंत्रणा असावी’, असेही त्या म्हणाल्या.