पुणे : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा पीएमपीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुुरुवारी रात्री स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी रात्री उशीरा पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कात्रजहून स्वारगेटकडे निघालेली पीएमपी बस स्वारगेट मेट्रो स्थानकासमोरुन निघाली होती. त्या वेळी पादचारी रस्ता ओलांडता होता. पीएमपीच्या चाकाखाली पादचारी सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले. चैाकशीत पादचारी रस्ता ओलांडत असातना पळत होता. अचानाक पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली तो सापडला, अशी माहिती पीएमपी चालकाने पोलिसांना दिली.

पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. स्वारगेट भाग गजबलेला असतो. स्वारगेट परिसरात पीएमपी, मेट्रो, तसेच एसटी स्थानक आहे. या भागात प्रवाशांची मोठी गर्दी असते.

स्वारगेट परिसरात बेशिस्तपणे रिक्षाचालक थांबत असल्याने या भागात कोंडी होत असल्यचो दिसून आले होते. त्यानंतर एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर थांबणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. शहरात भरधाव टँकरच्या धडकेत पादचारी मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. भाजी घेऊन घरी परत निघालेल्या घरकाम करणाऱ्या महिलेचा भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना वडगाव धायरी परिसरात नुकतीच घडली. दीपाली मंगेश तारू (वय २७, रा. पोकळे पाटील हाइट्स, धायरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांकडून मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.