पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात वेगवेगळ्या घटनांत प्रवासी महिलांच्या गळ्यातील एक लाख ६९ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात रविवारी (१० मे) सकाळी साडेआठच्या सुमारास प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक लाख ४ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय महिला धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहेत. त्या उन्हाळी सुट्टी असल्याने मुलांसोबत माहेरी निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने लांबविले.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सोमवारी (११ मे) एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्होली भागात राहायला आहेत. त्या गावी निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्याची घटना नुकतीच घडली होती.
दागिने सांभाळण्याचे आवाहन
‘उन्हाळी सुट्टीत अनेकजण परगावी जातात. स्वारगेट, मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी, तसेच पुणे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. दरवर्षी उन्हाळी सुट्टीत एसटी स्थानकाच्या आवारात महिलांचे दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढतात. दागिने चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी शक्यतो दागिन्यांचे प्रदर्शन करू नये. दागिने सांभाळावेत’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात आली होती. एसटी स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बिबवेवाडीत महिलेची सोनसाखळी हिसकावली
जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४१ वर्षीय महिला बिबवेवाडीतील लोकेश सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (१० मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या जेवण करुन मैत्रिणीसोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. लोकेश सोसायटीतील रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पोलिसांनी साेसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
