scorecardresearch

स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर त्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, तिघे जखमी

स्वर्णव चव्हाणच्या आत्याचा अपघाती मृत्यू झाला आहे.

पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी सापडला. डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर बुधवारी दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. तर, आठवडाभरांनी स्वर्णव सापडल्यानंतर तो सुखरुप असल्याची माहिती मिळताच त्याची आत्या त्याला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने त्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

स्वर्णव चव्हाण सुखरूप घरी पोचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर रात्रीच नांदेडवरून भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनीता संतोष राठोड चव्हाण या पती आणि दोन मुलासोबत नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांचे चार चाकी वाहन नगर महामार्गावर आले असताना अपघात झाला. अपघातामध्ये सुनीता संतोष राठोड यांचा मृत्यू झाला. तर समर राठोड (वय १४) आणि अमन राठोड (वय ६) हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन्ही मुलांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बुधवारी पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि  त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले होते.  

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune swarnav chavan aunty died in accident hrc 97 svk