पुणे : शहरात ‘स्वाइन फ्लू’च्या (एच१ एन१) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुलैत स्वाइन फ्लूचे ३५ रुग्ण होते, ती संख्या ऑगस्टमध्ये २२५ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ दोन रुग्ण आढळून आले होते. जानेवारी आणि मार्चमध्ये रुग्णसंख्या शून्य होती.
मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढू लागली. स्वाइन फ्लूमध्ये सुरुवातीला केवळ ताप, खोकला आणि घसादुखी होते. नंतर अनेक रुग्णांमध्ये या आजाराचे रूपांतर न्यूमोनियात होत असून, शरीरातील ऑक्सिजन पातळी ढासळण्याचा धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.सध्या देशात सक्रिय असणारा स्वाइन फ्लू सौम्य स्वरूपाचा असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने नुकतेच जाहीर केले. मात्र, सहव्याधी, तसेच वृद्ध नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
- अचानक तीव्र ताप येणे.
- सतत सुका किंवा कफयुक्त खोकला होणे.
- सर्दी होणे.
- घशात खवखव होणे किंवा गिळताना त्रास होणे.
- तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी आणि अंगदुखी होणे.
- सतत थकवा जाणवणे.
- उलट्या किंवा जुलाब होणे.
काय काळजी घ्यावी?
- साबण आणि पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ धुवावेत.
- खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा.
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा.
- अस्वच्छ हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावे.
- आजारी किंवा सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
- भरपूर उकळलेले पाणी प्यावे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा पौष्टिक आहार घ्यावा.
- लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सन २००९ मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूचे विषाणू पूर्णतः नष्ट न झाल्याने त्यात बदल होऊन उद्रेक होत राहतो. यावर मात करणारे प्रभावी औषध २००९ पासून उपलब्ध आहे. वेळेत निदान झाल्यास हा आजार गंभीर होत नाही. मात्र, यावर निर्माण केलेली नाकावाटे देण्याची लस २००९-१० नंतर बाजारात उपलब्ध नाही. ही लस पुन्हा योग्य प्रकारे वापरल्यास स्वाइन फ्लूचा वारंवार होणारा उद्रेक प्रभावीपणे रोखता येऊ शकतो. अशी माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
