Pune Symbiosis University Ray Ban Meta Glasses Exam Case: एकीकडे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराचे प्रकरण समोर आले आहे. परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थ्यांनी कॅमेरा असलेल्या चष्म्याचा ( Ray Ban Meta Glasses ) वापर केल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी त्या चष्म्याचा गैरप्रकार करण्यासाठी वापर केल्याचा पुरावा आढळून आलेला नाही. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेपासून प्रतिबंधित करण्यात आले असून, हे प्रकरण परीक्षा गैरप्रकार समितीकडे सोपवण्यात आले आहे.

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र कुलपती, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी या प्रकाराबाबतची माहिती दिली. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थी ‘रेबॅन मेटा ग्लास’ (अत्याधुनिक प्रकारचा चष्मा) वापरत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, असा चष्मा परीक्षेदरम्यान वापरता येत नसल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. अशा चष्म्याच्या वापर करून छायाचित्र काढणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाऊ शकतो. तसा काही वापर विद्यार्थ्याने केल्याचा पुरावा आढळून आलेला नाही. मात्र, या प्रकाराबाबतची तक्रार संस्थेतील गैरप्रकार समितीकडे नोंदवण्यात आली आहे.

आता विद्यापीठ स्तरावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची बाजू समजून घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल. संबंधित विद्यार्थ्यांना त्या परीक्षेपासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. समितीचा अहवाल हाती येण्याची प्रतीक्षा आहे,’ असे डॉ. येरवडेकर यांनी स्पष्ट केले.

रेबॅन मेटा ग्लास म्हणजे काय?

रेबॅन मेटा स्मार्ट ग्लासेस हे मेटा अर्थात फेसबुक या कंपनीने रेबॅन या चष्मे तयार करणाऱ्या कंपनीसह मिळून अत्याधुनिक ‘स्मार्ट चष्मे’ तयार केले आहेत. हे चष्मे दिसायला अगदी सर्वसामान्य असतात. मात्र त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. या चष्म्यात असलेल्या कॅमेऱ्यामुळे खिशातून फोन न काढता फोटो काढता येतो किंवा चित्रफित (व्हिडिओ) चित्रीत करता येऊ शकते. चष्मा ब्ल्यूटूथद्वारे फोनशी जोडलेला असल्याने चष्मा लावूनच कॉल घेणे, कॉल करणे शक्य होते. या चष्म्याला व्हॉइस असिस्टंटची सुविधा असते. त्यामुळे त्याला प्रश्न विचारून उत्तरं घेता येऊ शकतात. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही वापर करता येतो. याच चष्म्याच्या सहाय्याने लाइव्ह स्ट्रिमिंग किंवा थेट प्रक्षेपण करता येऊ शकते.