पुणे : मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हे काम करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी एका शिक्षकासह लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अनिल गायकवाड (वय ४२) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले शिक्षक हे उर्दू शाळेत शिक्षक आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेला लिपिक सार्वजनिक बांधकाम विभागात आहे. दोघांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोघांनी हे काम करण्यास दिरंगाई करुन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३४ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.
प्रवाशाांवरुन वाद रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंटची गट्टू घातला
प्रवाशांवरुन झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रत्र परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल कांबळे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्ष चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्या वेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरुन त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या डोक्यात घातला. पुजारी गंभीर जखमी झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक फौजदार रवींद्र भाेसले तपास करत आहेत.
नाचताना झालेल्या वादातून हाणामारी
नृत्य करताना झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना ओैंधमधील इंदिरा गांधी वसाहतीत घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसंनी टाेळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत कुणाल नंदकिशोर तुजारे (वय २२, रा. श्री हनुमान मंदिराजवळ, इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार,सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल तुजारे याचे वडील बुधवारी (१ एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गांधी वसाहतीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करत होते. ध्वनीवर्धकावर गीते लावण्यात आली होती. त्या वेळी नाचताना आरोपीला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला . या कारणावरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली. कुणाल आणि त्याचा पुतण्या आरोपींना जाब विचारण्यास गेले. तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण केली. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
