पुणे : राज्यातील शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील पाच जागा भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या पाठीशी शिवसेना (शिंदे) पक्षाची ताकद उभी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ‘महायुती म्हणून निवडणुका लढवत असलो, तरी काही ठिकाणी अपवाद म्हणून मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते’, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुणे  शिक्षक मतदारसंघातील सानप विरुद्ध भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे नवरात्र महोत्सवात आयोजित ‘महर्षी ‘ पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे त्यांनी सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही या मतदारसंघात दोन्ही पक्षांची भूमिका वेगळी राहण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे बडे नेते प्रचारात उतरणार

अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना ताकदीने मैदानात उतरणार असून, उद्यापासून पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. सानप हे अपक्ष उमेदवार असले, तरी त्यांच्या विजयासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि नेत्यांचे राजकीय वजन पणाला लावण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सानप यांची बाजू मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

महायुती म्हणून निवडणुका लढविण्याची भूमिका कायम ठेवतानाच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीला वाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि अपक्ष सचिन सानप यांच्यातील लढतीत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सानप यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते मैदानात उतरणार असल्याने ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील लढत न राहता महायुतीतील राजकीय समन्वयाचीही परीक्षा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाचही जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातच केला होता. या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जात असल्याने अपक्ष उमेदवार सानप यांचा प्रचार करण्याचा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या काही संबंधच नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला होता.