पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती केलेल्या आणि न झालेल्या राजकीय बंडांची. पण, ज्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार ही निवडणूक लढत आहेत, त्या शिक्षकांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर येणार का, याचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे शिक्षक मतदारंसघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि शिवसेनेने (शिंदे) पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्याकडे शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत. त्यावर उमेदवार कोणती भूमिका घेतात, यावर पुणे शिक्षक मतदारंसघाच्या निवडणुकीतील उमेदवारांची खरी परीक्षा व्हावी, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे. पूर्वी हे होत होते, पण गेल्या काही वर्षांत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांकडेही राजकीय कुरघोड्यांची संधी म्हणून पाहिले जाते. म्हणूनच, उमेदवारांची पक्षीय ओळख राजकीयदृष्ट्या सोयीची असली, तरी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठीची उमेदवारांची क्षमता आणि शासनाकडून निर्णय करून घेण्याची ताकद हेच अखेर प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वाचे ठरते, याचे भान न विसरण्याची शिक्षकांची अपेक्षा आहे.

शिक्षक प्रश्नांत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्ती हा आहे. निवृत्तीच्या जवळ पोहोचलेल्या शिक्षकांनाही या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी त्याविरोधात भूमिका घेतली. जुनी निवृत्तीवेतन योजना, अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षकांची पदे, शिक्षकेतर कर्चमाऱ्यांची कमतरता, भरती आणि पदोन्नतीतील अडचणी हे प्रश्नही कायम आहेत. निवडणूक कामे, विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन माहिती भरणे, प्रशासकीय अहवाल तयार करणे यांसारख्या जबाबदाऱ्याही शिक्षकांना पार पाडाव्या लागत असल्याने अध्यापनासाठीही वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. हे प्रश्न सरकारदरबारी मांडले जाऊन त्यावर शिक्षकवर्गाला उपाय अपेक्षित असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.

विद्यार्थी अभ्यासात अप्रगत राहून शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. शिक्षकांचा मौल्यवान वेळ अनावश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय कामांत खर्च न होता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापरला गेला पाहिजे. यासाठी विकसित राष्ट्रांच्या धर्तीवर स्वतंत्र प्रशासकीय सहायक यंत्रणा उभारण्यासाठी आणि अशैक्षणिक कामांचा भार पूर्णपणे कमी करण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने धोरणात्मक पाठपुरावा केला जाईल. – कौस्तुभ गावडे, भाजप उमेदवार

शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. यासंदर्भात विधिमंडळातही आवाज उठविण्यात आला होता. शिक्षकांची कामे महसूल विभागामार्फत करण्यास राज्य शासन सकारात्मक आहे. त्या संदर्भात यापुढेही पाठपुरावा केला जाईल. – जयंत आसगावकर, उमेदवार, काँग्रेस

शिक्षकांना दिली जाणारी कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठीही आग्रही भूमिका घेण्यात येणार असून, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. – सचिन सानप, अपक्ष उमेदवार