पुणे : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून कोणाला उमेदवारी जाहीर केली जाणार, कोण बंडखोरी करणार याचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २९ सप्टेंबरपासून उमेदवारीअर्ज दाखल करण्यास सुरुवात केली जाणार आहे. उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी ६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
या मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे विद्यमान आमदार आहेत. ते पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी प्रा. सचिन सानप, मुख्यमंत्री सहायता निधीचे माजी अधिकारी मंगेश चिवटे, कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे, माजी आमदार दत्ता सावंत, शिक्षक संघटनेचे नंदकुमार सागर हे उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
या मतदारसंघासाठी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही उमेदवारीबाबत संकेत देण्यात आलेले नाहीत. अद्याप कोणाचीही अंतिम उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष, उमेदवाराकडून स्वत:च्या पातळीवर निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत केवळ वैयक्तिक संपर्क, समाजमाध्यमांतून प्रचारावर भर देण्यात आला आहे. अधिकाधिक मतदारनोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या सुरू असलेला प्रचार, उमेदवारांची निवडणूक लढवण्याची तयारी पाहता शिक्षक मतदारसंघ चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
