हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरभ्र आकाशामुळे थंडीसाठी पोषक झालेल्या वातावरणानंतर पुणे, िपपरी-चिंचवड आणि परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. गुरुवारी शहरात १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. विशेष म्हणजे पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंडी असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील दोनतीन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरनंतर शहरातून थंडी गायब झाल्याचे चित्र होते. किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी आणि बुधवारी किमान तापमान ११.६ ते ११.७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता. गुरुवारी किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन ते १०.५ अंश सेल्सिअसवर आले.

विशेष म्हणजे महाबळेश्वर येथे गुरुवारी किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुण्याच्या तुलनेत हे किमान तापमान सुमारे तीन अंशांने अधिक असल्याने महाबळेश्वरच्या तुलनेत पुण्यात अधिक थंडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील थंड प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्याच्या तापमानात मोठी घट होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात थंडी आहे. विदर्भापाठोपाठ ही थंडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागातही वाढत आहे. पुणे शहरामध्ये रविवारपासून किमान तापमानात घट नोंदविली जात आहे.

पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे, तर तापमान १० अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे ८.९ अंश सेल्सिअस आहे. उस्मानाबादसह नाशिक (९.२), जळगाव (१०.०), गोंदिया (१०.२) या ठिकाणचे किमान तापमान पुण्यापेक्षा कमी आहे. इतर ठिकाणी मात्र किमान तापमान अधिक आहे. मुंबईचे किमान तापमान अद्यापही २० अंश सेल्सिअसच्या घरात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune temperature decreases
First published on: 22-12-2017 at 03:15 IST