पुणे : औषधविक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख २८ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत औषधविक्रेत्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय परिसरात पूनमचंद मेडिकल शॉप हे औषधविक्री दुकान आहे.
गुरुवारी (१९ जून) पहाटे तीन चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटला. दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील एक लाख २८ हजारांची रोकड लांबविली. गुरुवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.