पुण्याला तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणांत जमा

धरणक्षेत्रात अद्याप पावसाची संततधार सुरूच

pune rain, pune water supply
खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक १५८ मिमी पाऊस झाला.

पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सोमवारी सकाळपर्यंत ३.९० टीएमसी इतका पाणीसाठी जमा झाला आहे. सध्या शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्याच पद्धतीने पुरवठा कायम ठेवल्यास हा साठा तीन महिन्यांपर्यंत पुरू शकतो. धरणक्षेत्रात अद्याप पावसाची रिपरिप सुरूच असून, पाणीसाठ्यात पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक १५८ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल वरसगावमध्ये १२२ मिमी, पानशेतमध्ये १२० मिमी तर खडकवासला धरणामध्ये ९४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेतमध्ये सध्या १.८२ टीएमसी इतका तर वरसगावमध्ये १.१६ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी संपूर्ण खडकवासला प्रकल्पामध्ये ३ जुलै रोजी ७.३३ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा संपूर्ण जूनमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. शहराच्या पाणी पुरवठ्यात आणखी कपात करण्याची शक्यता होती. त्यासाठी येत्या शुक्रवारी महापालिकेने एक बैठकही बोलावली होती. मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पुणेकरांवरील जास्तीच्या पाणी कपातीचे संकट तूर्ततरी सरल्याची स्थिती आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात शनिवारपर्यंत पुण्यात पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune three months water in khadakwasla project