Pune Tilak Road History highlights : बाजारपेठ विस्तारू लागली की, पूर्वी रुंद असलेले रस्तेही अपुरे पडू लागतात. रस्त्यांच्या दुतर्फा दालनांची संख्या आणि माणसांची गर्दी वाढते. पण, हा सगळा बदल पचवून पुण्याची ओळख म्हणून टिकलेला एक रस्ता पुण्यात आहे. मध्यवर्ती पेठांना जोडणारा टिळक रस्ता गर्दीचा ताण, पायाभूत सुविधांचा प्रश्न आणि जुन्या-नव्या सांस्कृतिक प्रवाहांना सामावून घेत वाहतो आहे.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी घोषणा करणारे इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातील भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या नावाचा हा रस्ता. या रस्त्याला डेक्कन जिमखान्याच्या बाजूने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातून सुरुवात होते. या रस्त्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत अनेक ऐतिहासिक खाणाखुणा आहेत.
ज्येष्ठ इतिहास संशोधक राजा दीक्षित सांगतात, ‘टिळक रस्त्याच्या सुरुवातीला एकाच इमारतीत प्रसिद्ध साहित्यिक-प्रकाशक राजेंद्र बनहट्टी यांची प्रकाशन संस्था, दिलीपराज प्रकाशनाचे कार्यालय आणि स्वातंत्र्याच्या एक वर्ष आधी ‘हंस’ हे प्रसिद्ध वाङ्मयीन मासिक सुरू करणाऱ्या अनंत अंतरकरांचे वास्तव्य होते. पुढे, चित्रकूट बिल्डिंगमध्ये ‘सोबतकार’ ग. वा. बेहेरे यांचे आणि त्याला लागूनच प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे पुण्यातील कार्यालय. थोडे पुढे आले की, न्यू इंग्लिश स्कूल. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी स्थापन केलेली ऐतिहासिक शाळा. या शाळेत लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर शिकले. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत आणि मराठी कादंबरीचे जनक हरी नारायण आपटेही याच शाळेचे विद्यार्थी. समोरच्या बाजूला महाराष्ट्र साहित्य परिषद. परिषदेला मोठा ऐतिहासिक वारसा. अनेक नामवंतांनी परिषदेतून साहित्य चळवळ पुढे नेली. परिषदेपासून थोडे पुढे, शि. वा. दामले यांचे महाराष्ट्र व्यायाम मंडळ. दामले यांनी बलोपासना शिकवण्यासाठी, मराठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे म्हणून व्यायाम मंडळ सुरू केले, तेथे प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली. मंडळाच्या समोरच्या बाजूला चिमणबाग. या चिमणबागेत संस्कृतचे प्रसिद्ध प्राध्यापक के. ना. वात्त आणि त्यांचे जावई प्रसिद्ध अभिनेते शरद तळवलकर राहत असत. याच परिसरात पुण्यातील वादळी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले, उपमहापौर झालेले प्र. बा. जोग यांचे वास्तव्य. त्याच्या थोडे पुढे, कोपऱ्यावर बादशाही हॉटेल. तिथली गरगटी भाजी आणि शाकाहारी जेवण आजही प्रसिद्ध आहे. समोरच अलका टॉकीजचे संस्थापक भास्करराव धारप यांचा बंगला.’
या बंगल्याच्या पुढे गेल्यावर टिळक स्मारक मंदिर लागते. लोकमान्यांनी ‘केसरी’साठी घेतलेला जुना छापखाना इथे आहे. इथल्या सभागृहात भिंतींवर लोकमान्य टिळकांचा जीवनपट सांगणारी चित्रे कोरलेली दिसतात. दीक्षित सांगतात, ‘ही चित्रे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार गोपाळ देऊस्कर यांनी काढलेली. फर्ग्युसन महाविद्यालयातील आगरकरांसह अनेक प्राचार्यांची ऐतिहासिक चित्रे आणि बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्वांचे चित्र याच देऊस्करांनी काढलेले. टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या वसंत व्याख्यानमालेने वर्षानुवर्षे पुण्याचे वैचारिक भरणपोषण केले. पुढे सदाशिव पेठेचे टपाल कार्यालय आणि त्याच्या आतल्या बाजूला प्रसिद्ध अभिनेते राम नगरकरांचे केशकर्तनालय. जवळच स. प. महाविद्यालय. अनेक नामवंतांचा, पुण्याच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या या महाविद्यालयाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आचार्य अत्र्यांच्या सभा गाजल्या. परिसरात पूर्वी जीवन हॉटेल होते. ग्राहक पंचायतीची ग्राहक पेठही याच परिसरात. पुढे, हिराबाग चौक. न्यायमूर्ती रानडे आणि इतर मंडळी तिथे जमत, त्यांची भाषणे, कार्यक्रम तिथे व्हायचे. आता तिथे नेहरू स्टेडियम आहे. पुढे आलो, की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची इमारत. व्यापार आणि आर्थिक घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेली ही संस्था आता सभागृहात होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजलेली दिसते.’
खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली खास ठिकाणे – दुर्वांकूर, एसपीज् बिर्याणी, हॉटेल गिरिजाही याच रस्त्यावर. बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक ते उच्च शिक्षण – सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था या रस्त्यावर आहेत. ज्ञानप्रबोधिनी आणि आजूबाजूच्या परिसरात अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांच्या शिकवणी वर्गांची नवी बाजारपेठही आता विस्तारत आहे. हिराबागेजवळच असलेल्या शिवाजीराव ढेरे उद्योग भवनात पुणे महापालिकेचे जिजाऊ अंगीकृत प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे पार्लर, शिवणकाम, एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण दिले जाते. भरपूर जुन्या इमारती आणि त्यांच्या तळमजल्यावर असलेली दुकाने या ना त्या कारणाने प्रसिद्ध. आता या दुकानांमध्ये वाढत्या उन्हाची झळ बसू नये म्हणून स्प्रिंकलर्स लागलेले दिसतात.
बदलांचे पडसाद सर्वच रस्त्यांवर कमी-अधिक प्रमाणात उमटतात. पण, टिळक रस्ता मध्यवर्ती म्हणून महत्त्वाचा. पेठांमधून येणारे अनेक उपरस्ते या रस्त्याला जोडले जातात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच. त्यात अलीकडे सतत विस्कळीत होणाऱ्या विजेचा प्रश्न. उकरलेल्या रस्त्यांचा, बांधकामांचा राडारोडाही काही ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला. रस्त्यावरच्या पीएमपीच्या दोन बस थांब्यांचा आमदार-खासदारांनी कायापालट केला. बाकींच्याचे काय, हा प्रश्न मात्र तसाच आहे.
