पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी महापालिकेच्या भूसंपादन आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये गेले अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण, कोथरूड विधानसभा मतदार संघातील मिसिंग लिंकसह २९ प्रकरणांची सद्य:स्थिती आणि पुढील कार्यवाहीला गती देण्यासाठी नियोजन करण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. या बैठकीला भूसंपादन व मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांच्यासह भूसंपादन विभागाकडील अधिकारी उपस्थित होते. यावेळी भूसंपादनाच्या २७ प्रकरणांवर सविस्तर चर्चा झाली.

पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले महात्मा फुले स्मारक, शिवणे-खराडी रस्ता, कात्रज कोंढवा रस्त्याची संयुक्त मोजणीची प्रलंबित प्रकरणे, कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठीची प्रलंबित प्रकरणे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ॲवॉर्डसाठी असलेली प्रकरणे, शासनाकडून निधी मागितलेल्या प्रस्तांवामध्ये सुधारणा करणे यावर चर्चा झाली. भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी स्थानिक पातळीवर नागरिक, महसूल विभाग आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक, कात्रज कोंढवा रस्ता तसेच शिवणे ते खराडी रस्त्याचे काम पूर्ण करणे, त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यासाठी संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका