पुणे : गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचे सर्व आरक्षण संपले असून, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर पहिल्या टप्प्यात २२ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच, ग्रुप बुकिंगलाही प्रतिसाद मिळत असून, सुमारे ३० गाड्यांच्या आगाऊ नोंदणीसाठी प्रवाशांनी चौकशी केली असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याची माहिती एसटीच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.
दर वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवांशांची संख्या मोठी असते. यंदा १४ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार गणरायाच्या उत्सवासाठी कोकणात जाण्याची परंपरा असलेल्या हजारो भाविकांनी नेहमीप्रमाणे नियोजन सुरू केले आहे. स्वारगेट आणि चिंचवड स्थानकातून कोकणातील चिपळूण, दापोली, रत्नागिरी, खेड, देवरुख, मंडणगड, तिवरे, सिंधूदुर्ग, लांजा आदी मार्गांवर गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. स्वारगेट व चिंचवड स्थानकांवरून कोकणातील विविध शहरांकडे जाणाऱ्या नियमित गाड्यांच्या जागा भरल्याने, अतिरिक्त गाड्यांची मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘एनसीएमसी कार्ड’ असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी सवलतीही लागू असणार आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी अतिरिक्त गाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर या गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. मुंबई-पुण्यातून कोकणात जाताना मार्गावर घाट, तीव्र वळणाचे रस्ते आणि चढ-उतार असतात. पावसामुळे अनेकदा प्रवासात अडथळे येतात. एसटीमध्ये तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे प्रवाशांना दीर्घ काळ ताटकळत बसावे लागते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रमुख मार्गांवर दुरुस्ती पथके तैनात करण्यात येतात.
प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा म्हणून एसटी महामंडळाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन, गरजेनुसार आणखी गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने दर्शवली आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांची धावपळ होणार नाही. गणपतीच्या काळात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुख्य मार्गांवर प्रवाशांच्या मदतीसाठी कर्मचारी तैनात असतील. प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीसाठी स्थानकावरील चौकशी केंद्राशी संपर्क साधावा. कोकणात जाणाऱ्या भाविकांना सुरक्षितपणे पोहोचवणे हेच एसटी महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येते.
एसटीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
गणेशोत्सवानिमित्त कोकणातील ‘एसटी’चे आरक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, हा सुरुवातीचा टप्पा आहे. आता २२ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या आरक्षणानुसार गाड्या सोडण्यात येणार आहेत, असे एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले.
