पुणे : निसर्गाची ओढ, फिरण्याचे वेड आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पुण्यातले तीन हौशी मित्र संदीप पत्की ( वय ५५), राजीव शाह (वय ६०) आणि श्रीनिवास राठी (वय ७१) हे तीन १० एप्रिल ते २० जून या कालावधीत पुणे ते लंडन या जमिनीमार्गे प्रवासासाठी शुक्रवारी रवाना झाले.

मित्रमंडळ चौकातून त्यांना सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला. यापैकी राजू शहा वास्तुविशारद असून श्रीनिवास राठी आणि संदीप पत्की उद्योजक आहेत.

युवराज शहा म्हणाले, ‘आपण या प्रवासाचा वापर देशो-देशातील प्रेम आणि बंधुत्वाची भावना वृद्धींगत करून, भारतीय समाजाचे दूत म्हणून काम करा. पूर्वीच्या काळात कलकत्ता ते लंडन अशी बससेवा चालू होती.’हे तीन मित्र ७५ दिवसांत २० देश ओलांडून सुमारे १६ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही महत्त्वाकांक्षी साहसयात्रा अॅडव्हेंचर्स ओव्हरलँड या भारतातील अग्रगण्य क्रॉस-बॉर्डर रोड ट्रिप कंपनीद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

“रोड टू लंडन” ही मोहीम जगातील सर्वात प्रतिष्ठित स्वचलित प्रवासांपैकी एक मानली जाते. दोन महिन्यांच्या या प्रवासात सहभागी असलेले हे तिघे जण विविध देशांतील भौगोलिक परिस्थिती, संस्कृती आणि हवामानाचा अनुभव घेत छायांकनही करणार आहेत.

‘भारत, नेपाळ, चीन, मध्य आशिया, रशिया आणि युरोप मार्गे अखेर ब्रिटनमध्ये लंडनमध्ये हा प्रवास पोहचेल. सध्याची युद्धजन्य परिस्थिती, लांब पल्ल्याचा प्रवास, सीमारेषांवरील अनिश्चितता, हवामानात अचानक होत जाणारे बदल आणि विविध देशातील शाकाहारी खाद्यसंस्कृती यामुळे हा प्रवास अधिक आवाहनात्मक असला तरी आयुष्य समृद्ध करणारा असेल,’ असे मत या प्रसंगी तिघांनी व्यक्त केले.

प्रवासाची वैशिष्ट्ये

• भारत, नेपाळ, चीन, मध्य आशिया, रशिया आणि युरोपमधील प्रवास
• तिबेटमधील १७ हजार फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट
• ल्हासामधील भव्य पोटाला पॅलेसचा अनुभव
• गोबी वाळवंटातून प्रवास आणि बॅक्ट्रीयन उंटावर स्वारी
• किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक सिल्क रूट
• जर्मनीच्या वेगवान ऑटोबानचा अनुभव
• बुडापेस्टमधील डॅन्यूब नदीवरील क्रूझ
• ब्लू मॉस्क, चार्ल्स ब्रिज, अटोमियम यांसारख्या जागतिक स्थळांना भेट