पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी शहरातील सर्व हाेर्डिंग दाेन महिने जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला असून, आता दोन महिन्यांची मुदत १४ दिवसांवर आणण्यात आली आहे. आता २५ मे ते ७ जून २०२५ या कालावधीतच होर्डिंग जाहिरातीविना ठेवण्यात येणार आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंगधारक आणि महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची गेल्या नऊ ९ एप्रिल रोजी बैठक झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यात जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंगवर जाहिराती न लावण्याचा निर्णय घेतला होता.

या कालावधीत होर्डिंग रिकामी ठेवली जाणार होती. या निर्णयास होर्डिंगचालकांनी बैठकीत सहमतीही दिली होती. मात्र, तरीही बहुतांश होर्डिंगवर गृहप्रकल्प, राजकीय नेते, विविध कार्यक्रम, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे होर्डिंगचालकांची पुन्हा बैठक घेण्यात आली. त्या वेळी, ‘या काळात होर्डिंगवरील जाहिरातीसाठी मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे जाहिरात न लावल्यास उत्पन्न बुडते,’ असा सूर हाेर्डिंगधारकांनी आळवला. त्याला सहमती देऊन प्रशासनाने दोन महिन्यांची मुदत १४ दिवसांवर आणली. त्यामुळे आता २५ मे ते ७ जून या १४ दिवसांत होर्डिंगवर जाहिराती न लावता ती रिकामी ठेवली जातील.

या दोन महिन्यांच्या काळात जाहिरातीद्वारे मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळे कालावधी कमी करण्याची विनंती होर्डिंगधारकांनी केली. त्यानुसार पावसाळ्यापूर्वीच्या दोन आठवड्याच्या काळातच होर्डिंग रिकामी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदीप ठेंगल उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिक