पुणे : ‘राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या (एनपीएस) नोकरदार सदस्यसंख्येत पुण्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. पुण्यातील एकूण १ लाख १३ हजार नोकरदार ‘एनपीएस’चे सदस्य आहेत. त्यांची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ९ हजार १०७ कोटी रुपये आहे. याच वेळी वैयक्तिक सदस्यांच्या बाबतीत राज्यात पुणे दुसऱ्या स्थानी आहे,’ अशी माहिती निवृत्तिवेतन नियामक मंडळ अर्थात ‘पीएफआरडीए’चे पूर्णवेळ सदस्य संजय पांडे यांनी सोमवारी दिली.

‘महाराष्ट्रात ‘एनपीएस’ची प्रमुख पाच केंद्रे असून, त्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि रायगडचा समावेश आहे. राज्यात ‘एनपीएस’चे एकूण नोकरदार सदस्य ३ लाख २६ हजार असून, व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३३ हजार ५२८ कोटी रुपये आहे. पुणे हे नोकरदार सदस्यसंख्येत आघाडीवर असून, त्यांची संख्या १ लाख १३ हजार ३६ आहे. पुण्यातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता ९ हजार १०७ कोटी रुपये आहे. याच वेळी राज्यातील ‘एनपीएस’ची एकूण वैयक्तिक सदस्यसंख्या ४ लाख ७१ हजार ७९६ असून व्यवस्थापनाखालील मालमत्ता १२ हजार ९२९ कोटी रुपये आहे. त्यात पुणे १ लाख ४० हजार सदस्यसंख्येसह दुसऱ्या स्थानी असून, व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३ हजार ६४ कोटी रुपये आहे,’ असे संजय पांडे यांनी सांगितले.

‘‘एनपीएस’मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील लोकसंख्येची स्थिती बदलत असल्याने निवृत्तिवेतन नियोजनेला महत्त्व येऊ लागले आहे. देशाच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत ६० वर्षे आणि त्यावरील नागरिकांचे प्रमाण १९.५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. याच वेळी सरासरी आयुर्मान ७५ वर्षांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. यामुळे विविध प्रकारची निवृत्तिवेतन उत्पादने आणण्यात येत आहेत. ती अधिक सोपी आणि सहजपणे स्वीकार करता येण्यासारखी आहेत. ही उत्पादने जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पीएफआरडीए’कडून जनजागृतीवर भर दिला जात आहे,’ असे पांडे यांनी नमूद केले.

राज्यातील ‘एनपीएस’ नोकरदार सदस्यसंख्या

केंद्र…..सदस्य…..व्यवस्थापनाखालील मालमत्ता (कोटी रुपयांत)
पुणे…….१,१३,०३६…….९१०७
मुंबई…….१,०१,९१३…….१३,३८०
ठाणे…….७०,७८२…….६५६६
नागपूर…….२१,४४१…….२१९५
रायगड…….१९,८०८…….२२८०
एकूण…….३,२६,९८०…….३३,५२८

राज्यातील ‘एनपीएस’ वैयक्तिक सदस्यसंख्या

केंद्र…….सदस्य…….व्यवस्थापनाखालील मालमत्ता (कोटी रुपयांत)
मुंबई…….१,६८,५३९…….६११८
पुणे…….१,४०,५१८…….३०६४
ठाणे…….९५,५३१…….२५६८
नागपूर…….३७,७४०…….५३४
रायगड…….२९,४६८…….६४५
एकूण…….४,७१,७९६…….१२,९२९