पुणे : अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (१९ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणा आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे. महापालिका भवनकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौकातून जातील. आप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बाजीराव रस्त्याने वळविण्यात येणार आहे. लाल महाल चौकातून गणेश रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.