पुणे : परवानगी नसतानाही खासगी प्रवासी गाड्या रस्त्यांवर तासन् तास उभ्या राहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या गाड्या रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापून थांबत असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागांत वाहतूक कोंडीत भर पडत असून, अपघातांचा धोकाही वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
खासगी प्रवासी गाड्यांना शहरात कोणत्याही ठिकाणी थांबण्याची परवानगी नाही. त्यांना शहराबाहेर संगमवाडी, वाकड, कात्रज अशा काही नाक्यांवर थांबे देण्यात आले आहेत. मात्र, पुण्यातून बाहेर जाणाऱ्या विविध रस्ते-नाक्यांवर स्वारगेट, लक्ष्मीनारायण टॉकीजसमोर, कात्रज चौक, वाकड, जहांगीर रुग्णालय परिसरात रात्रीच्या वेळी आणि सुट्ट्यांच्या दिवशी शेकडो खासगी प्रवासी गाड्या रस्त्याच्या कडेला तासन् तास उभ्या राहिलेल्या दिसतात. शहराच्या मध्यवर्ती भागात, स्वारगेट, शिवाजीनगर, कर्वेनगर परिसरातही या गाड्या उभ्या असतात.
प्रवासी गाड्या आकाराने मोठ्या असतात. त्या रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आक्रसतात. परिणामी, वाहतूक कोंडीत मोठी भर पडत असल्याचे चित्र आहे. तसेच, या बस वर्दळीच्या ठिकाणी अधे-मधे थांबत असल्याने अपघातांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. वाहतूक पोलिसांकडूनही या प्रकाराकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
प्रवासी बसना थांब्यांसाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी गाड्यांनीही दिलेल्या थांब्यांवरच थांबणे गरजेचे आहे. जास्त रहदारीच्या वेळी या गाड्यांना शहरात थांबू न देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी पार पाडावी. – आदित्य चावंडे, परिसर संस्था
वाहतूक पोलिसांनी नेमून दिलेल्या थांब्यांवरच गाड्यांनी थांबणे बंधनकारक आहे. त्यानुसारच आमच्या गाड्या थांबतात. खासगी प्रवासी गाड्या शहरात कुठेही थांबल्या नाहीत, तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. ज्या गाड्या अधे-मधे थांबत असतील, त्यांच्यावर दंडात्मक आणि ऑनलाइन संकेतस्थळावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येते. – जगदीश स्वामी, नर्मदा ट्रॅव्हल्स
खासगी प्रवासी गाड्यांना थांबा नेमून देणे गरजेचे आहे. आता रस्त्याच्या अधे-मधे थांबणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांवर नो-पार्किंगचा दंड आकरण्यात येतो. – स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
