Pune Traffic Jam Due To Non Working Signals: सिग्नल बंद असल्याने मध्यवर्ती पेठांसह शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र आहे. तर, नियमनाअभावी वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी पुणे महापालिकेच्या वतीने विविध रस्त्यांवर, चौकांमध्ये सिग्नल बसवण्यात येतात. सिग्नल बसवायच्या जागा, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम वेळच्या वेळी करणे गरजेचे असते.
वाहतूक नियोजनासाठी सिग्नल सुरू असणे आवश्यक असते. मात्र, शहरातील बहुतांश रस्त्यांवर बसविण्यात आलेले सिग्लन देखभाल-दुरुस्तीअभावी बंद आहेत. तर, जागा चुकीची म्हणून नव्याने बसविण्यात आलेले सिग्नल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाने विस्तारणाऱ्या पुण्याचे वाहतूक नियोजन कोलमडत असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांच्या समस्येत भर पडत आहे.
मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी सिग्नल नाहीत. काही रस्त्यांवर नव्याने सिग्नल बसविण्यात आले. त्यामुळे एका चौकातून दुसऱ्या चौकात जायला काही वेळ थांबावे लागते. न. चिं. केळकर रस्त्यावर अप्पा बळवंत चौकातून पुढे आल्यावर लगेचच केसरीवाड्याच्या अलीकडे सिग्नल लागतो. त्यामुळे काही प्रमाणात परिसरातील वाहतुकीचे नियोजन होते.
अशाच प्रकारे लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर शामराव गांजवे चौकातून पुढे आल्यावर वैकुंठ स्मशान भूमीकडे जाणाऱ्या चौकात सिग्नल बसविण्यात आला. ‘एक-दोन महिन्यात हा सिग्नल बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेच; पण अपघात होण्याची शक्यताही बळावते. या चौकात वादाचे प्रसंगही नेहमी घडतात,’ अशा शब्दांत एका रिक्षाचालकाने सिग्नल सुरू असणे गरजेचे असल्याचे नमूद केले.सिग्नल मोडणाऱ्यांवर करण्यात येणारी कारवाई किरकोळ स्वरूपाची असून, बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे सिग्नल मोडणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याची मागणी वाहतूक क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येते.
रस्त्यांवर बसवलेले सिग्नल कोणत्याही परिस्थितीत सुरू असणे गरजेचे आहे. लोकांच्या पैशांतून सिग्नल बसविण्यात येतात. सिग्नल सुरू नसतील, तर त्याची कारणे जाहीर करणे गरजेचे आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. विवेक वेलणकर
अध्यक्ष, सजग नागरिक मंच
पुण्यासारख्या शहरात सिग्नल बंद असणे, पथदिवे बंद पडणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. साध्या तारा जोडून सिग्नल सुरू ठेवणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती वेळच्या वेळी करणेही महापालिकेच्या विद्युत विभागाला जमत नाही. या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते- हर्षद अभ्यंकर
अध्यक्ष, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट
तुमच्याही समस्या पाठवा
दररोजच्या जीवनात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, प्रश्न, प्रशासनाकडून अपेक्षा याबाबत तुमचे अनुभव ‘लोकसत्ता’कडे पाठवू शकता. यामध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनादेखील नागरिक सुचवू शकतात. यातील महत्त्वाच्या पत्रांची दखल घेऊन त्याला ‘लोकसत्ता’च्या तगादा सदरामध्ये प्रसिद्धी दिली जाईल.
तुमच्याही समस्या पाठवा : lokpune4@gmail.com
