पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी (९ जुलै) बदल करण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यभागातील बहुतांश रस्ते पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करुन देण्यात येणार आहे.
प्रथेप्रमाणे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर एकत्र येतात. नरवीर तानाजी वाडी (वाकडेवाडी), पाटील इस्टेट येथून दोन्ही पालख्या शहरात दाखल होतात. शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गे पालखी सोहळा मुक्कामी दाखल होतो. प्रथेप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गुरुवारी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहेत. पालखी सोहळ्यातील वाहतूक बदल, तसेच पर्यायी मार्गांची आखणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे , तसेच वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी केली आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त बंद असलेले रस्ते (पहाटे तीन ते रात्री आठपर्यंत)
- बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी (पर्यायी रस्ता – धानोरी रस्ता, अंतर्गत रस्ते)
- प्रादेशिक मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक (पर्यायी रस्ता – येरवडा कारागृह रस्ता, विमानतळ रस्ता)
- सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट (पर्यायी रस्ता – पर्णकुटी चौक, मंगलदास चौक, आरटीओ चौक)
- नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक वाहतूक बंद
- बोपोडी चौक ते चर्च चौक (पर्यायी रस्ता – बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक, ओैंध रस्ता)
- पोल्ट्री फार्म चौक, ओैंध, बालेवाडी मार्ग (पर्यायी रस्ता – रेल्वे पोलीस मुख्यालय, ब्रेमेन चैाक)
- पिंपरी-चिंचवडमार्गे पुणे शहरात येणारी वाहतूक (भाऊ पाटील रस्ता, ब्रेमेन चौक)
- शादलबाबा दर्गा, येरवडा ते पाटील इस्टेट, वाकडेवाडी, अभियांत्रिकी महाविद्यालय
- होळकर पूल ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकी वाहतूक बंद
अभियांत्रिकी महाविद्यालय ते श्री संत तुकाराम पादुका चौक (सकाळी ८ ते रात्री ११)
- रेंजहिल चौक ते संचेती चौक (पर्यायी रस्ता – रेंजहिल, सेनापती बापट रस्ता, नळस्टाॅप चौक)
- खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (पर्यायी रस्ता – कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल)
- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक (पर्यायी रस्ता – कुंभारवेस चौक, आरटीओ चौक)
श्री तुकाराम पादुका चाैक ते बेलबाग चौक (दुपारी १२ ते रात्री ११)
- फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता
- डेक्कन ते कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता
- लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक ते टिळक चौक
- शनिपार चौक ते सेवासदन चौक
- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गाडगीळ पुतळा चौक
- जिजामाता चौक ते बुधवार चौक
- नेहरु चौक ते सोन्यामारुती चौक
बेलबाग चौक ते निवडुंगा विठाेबा चौक, पालखी विठोबा मंदिर (दुपारी २ ते रात्री १२)
- लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक ते सेवासदन चौक
- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता ते जिजामाता चौक, बुधवार चौक ते बेलबाग चौक
- लक्ष्मी रस्ता ते बेलबाग चौक
- देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक
- साेमवार पेठ पोलीस चौकी ते डुल्या मारुती चौक
- रामोशी गेट ते पालखी विठाेबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक
