पुणे : तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (६ मार्च) मध्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
‘शिवजयंतीनिमित्त मध्य भागासह शहराच्या वेगवेेगळ्या भागांतून मिरवणुका काढण्यात येतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मिरवणूकमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यत येईल. मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सात वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
मध्य भागातील काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), झाशीची राणी चौकमार्गे, डेक्कन जिमखाना, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे. कसबा पेठेतील गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक दारूवाला पूल चौकातून वळविण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार नारायण पेठेतील केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौक, हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून सायंकाळी मिरवणुकीचा प्रारंभ होईल, मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर वाहतूक संत कबीर चौकातून नेहरू रस्त्याने वळविण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीरावर रस्त्याकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास पूरम चौकातून टिळक रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
लष्कर भागात वाहतूक बदल
लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक वाय जंक्शन येथून वळविण्यात येणार आहे. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशीदमार्गे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार आहे. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. बाबाजान चौकातून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतूक गरज भासल्यास वळविण्यात येणार आहे.
