पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (२९ सप्टेंबर) पहाटे सहापासून मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत.
‘मध्य भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना आदेशातून वगळण्यात आले आहे,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
मध्य भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे –
टिळक रस्त्यावरून पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्त्याचा वापर करावा. लोकमान्य टिळक चौकातून डेक्कन जिमखानामार्गे इच्छितस्थळी जावे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे जाणार आहेत. कसबा पेठेतील गणेश रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अपाेलो चित्रपटगृह चाैक, दारूवाला पूल, गणेश पेठेतील दूधभट्टीमार्गे इच्छितस्थळी जावे. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून गणेश रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनांनी गाडगीळ पुतळा चौक, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
