पुणे : ‘पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दल ‘तंत्रज्ञान, तज्ज्ञ सल्लागार, नागरिकांचे सहकार्य’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणार आहेत. मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरात वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,’ असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी शनिवारी केले.
पुणे शहरातील वाहतूक समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, बससेवा, पार्किंग समस्या, तसेच रस्ता सुरक्षेबाबत विचारविनिमय करण्यासाठी पुणे शहर, जिल्हा काँग्रेस समिती पश्चिम विभागाकडून पुणे ट्रॅफिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी परिषदेचे आयोजन केले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, ‘पीएमपी’च्या सह कार्यकारी संचालक एलिस पोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, परिवहन अधिकारी साखरे, पुणे मेट्रोचे अधिकारी मिहीर कुलकर्णी, डाॅ. राहुल सावंत, दै. सकाळचे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, नगरसेवक रफिक शेख, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे आदी या वेळी उपस्थित होते.
‘पुण्यातील वाहतूक समस्या ही केवळ रस्त्यावरची राहिलेली नाही. नागरिकांच्या आरोग्य आणि मानसिक आरोग्याशी ही समस्या निगडित आहे. वाहतूक कोंडीचा विचार केल्यास शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील सरासरी दोन वर्षे वाहतूक कोंडीत जात आहेत. पुणे शहरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ५०० कॅमेरे बसविले जाणार आहेत. हे कॅमेरे स्वयंचलित पद्धतीने काम करतील. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कॅमेऱ्यांद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत मानवी हस्तक्षेप राहणार नाही. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
आठवड्यातून एक सार्वजनिक वाहतूक दिन
‘रस्त्यावरील वाहनांची गर्दी विचारात घेऊन शहरात प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ उपक्रम राबविला पाहिजे. शहरातील विविध खासगी, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक दिन पाळायला हवा,’ अशी सूचना मनोज पाटील यांनी केली.
