पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत २४८ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, निविदांची छाननी करण्यात आली आहे. ‘पीएमआरडीए’कडून तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्यांमुळे शहराच्या उपनगरी भागांतील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतूक कोंंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहेत. विविध भागांतील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे आदेश ‘पीएमआरडीए’ने दिले आहेत.

तसेच वर्तुळाकार रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी आवश्यक असलेल्या जमिनींची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

रस्त्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव

नाशिक फाटा ते राजगुरूनगर (एनएच-६०) या मार्गावरील उन्नत मार्गिकेच्या प्रवेश मार्गासाठी (ॲप्रोच रॅम्प) नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण (ता. खेड) या गावांतील मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित आहेत. मुळशी तालुक्यातील बालेवाडी ते शेडगेवस्ती, सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती आणि नांदे – माण यांसह इतर मार्गावरील भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. नवले पूल परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक आराखड्यातील रस्ते

‘पीएमआरडीए’ क्षेत्रात करण्यात येणाऱ्या २४८ किलोमीटरच्या रस्त्यांपैकी काही रस्ते हे प्रादेशिक आराखड्यातील आहेत. तसेच पीएमआरडीएने रस्त्यांसाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीवर प्रस्तावित केलेले रस्ते आहेत. काही अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

‘पीएमआरडीए’ क्षेत्रात २४८ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काही रस्ते प्रादेशिक आराखड्यातील आहेत. ताब्यात घेतलेल्या जमिनीवरही रस्ते तयार केले जाणार आहेत. काही अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहेत. या रस्त्यांच्या निविदा काढल्या असून, त्यांची छाननी पूर्ण झाली आहे. – डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए