पुणे : आधीच अतिक्रमणे, वेडीवाकडी वाहने लावल्याने आकुंचन पावलेली रुंदी, बेशिस्त चालकांचे नियमभंग आणि त्यात आता मंडपांनी व्यापलेली जागा. शहरातील रस्ते सध्या असे गुदमरले आहेत. ‘रस्त्याच्या रुंदीच्या एक तृतीयांश आकाराचा मंडप असावा,’ हा नियम डावलून अनेक ठिकाणी मंडप-देखाव्यांची उभारणी करण्यात आल्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसते. वाहनांना गर्दीतून वाट काढून देताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होते.

गणेश मंडळांकडून गणरायाच्या आगमनासाठी मांडव टाकण्यात आले आहेत. शहराच्या मध्य भागातील रस्ते पुरेसे रुंद नाहीत. त्यांवर आधीच अतिक्रमणे, खाऊगल्ल्या, रस्त्यावरच लावलेली वाहने आणि सतत वाहणाऱ्या वाहनांचा ताण आहे. त्यात आता मंडपांची भर. मध्यवर्ती पेठांसह शिवाजीनगर, सिंहगड रस्ता परिसर, कात्रज आणि इतर उपनगरांमध्ये बव्हंशी असे चित्र आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस, शेअर रिक्षा अरुंद रस्त्यांवर अडकून पडत असून, काही रस्ते तर चारचाकी वाहनांसाठी बंद आहेत. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठीही प्रवाशांची कसरत सुरू आहे. वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांवरही ताण आहे. ‘बेशिस्त वाहनचालक कितीही सांगितले, तरीही ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत वाहनांना वाट काढून देणे शक्य होत नाही,’ अशी व्यथा एका वाहतूक पोलिसाने सांगितली.

‘चालण्याच्या अधिकाराचे उल्लंघन’

‘मंडप, देखावे, गणेशमूर्ती विक्रीसाठी लागणारे स्टॉल्स आणि अतिक्रमणांमुळे शहरांतील उरल्यासुरल्या पदपथांचीही अडवणूक झाली आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. अशा परिस्थितीत अपघात झाला, तर जबाबदारी कोणाची? हे चालण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे,’ असे परिसर संस्थेचे अभ्यासक आदित्य चावंडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘रस्त्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचे पालन होत नाही. महापालिका आणि पोलिसांकडून एक खिडकी योजनेद्वारे मंडपांना परवानग्या दिल्या जातात. परवानगीसाठीच्या निकष-नियमांकडे मात्र काणाडोळा केला जातो. दिवाळीत जशी फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी सुरक्षेचे निकष लावून मोकळ्या मैदानांमध्ये जागा दिली जाते, त्याचप्रमाणे गणेशोत्सवातील स्टॉल्ससाठीही स्वतंत्र जागांचे नियोजन करायला हवे. पदपथ म्हणजे सहज उपलब्ध असलेली जागा, असे गृहीत धरू नये. पायी चालणारा माणूसही वाहतुकीचाच भाग आहे.’

पूर्वी गणेशोत्सवात चार-पाच दिवस आधीपासून मंडप, देखाव्यांच्या तयारीला सुरुवात होत असे. अगदी मोठ्या मंडळांकडूनही दहा-बारा दिवस आधीच तयारी सुरू व्हायची. मंडळांची संख्याही कमी होती. त्यामुळे रस्त्यांची अडवणूक होत नसे. आता मंडळे आणि गाड्यांचीही संख्या वाढली. पण, रस्ते तेवढेच आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होतात. विलास लेले अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

एकाच चौकात, शंभर-दोनशे मीटरच्या अंतरात दोन-तीन मंडळे असतात. पुण्यात आधीच वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मंडळांनी एकत्र आले पाहिजे. एका भागात किती मंडळे असावीत, याबाबत स्पष्ट नियम असावेत. तसेच, मंडळांसाठी आदर्श नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे. विवेक वेलणकर अध्यक्ष, सजग नागरिक मंच

मंडपांमध्ये सुधारणा होत आहे. अनेक मंडळांनी खड्डेविरहित मंडप उभारले आहेत. तर, अनेक चिंचोळ्या मांडवांच्या कमानींखालून वाहतुकीला मार्ग काढून दिला आहे. आपल्या मंडळाचा लौकिक वाढावा, अशी भावना असलेल्या मंडळांकडून अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. इतर मंडळांनीही या सुधारणांचा स्वीकार करायला हवा. आनंद सराफ, सामाजिक कार्यकर्ते

शहरातील गणेश मंडळांना पोलिसांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. त्यानुसार मंडप उभारले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या परवानगीपेक्षा एखाद्या मंडळाने अधिक आकारातील मंडप उभारले असतील आणि त्यामुळे वाहतुकीला त्रास होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सोमनाथ बनकर उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका