पुणे : शहरात रस्त्याच्या कडेला मोटारी, दुचाकी लावल्या जातात. त्या जागेवरुन हलविल्या जात नाहीत. अशी वाहने बेवारस म्हणून ओळखली जातात. सूचना देऊनही ही वाहने हलविण्यात येत नसल्याने वाहतूक पोलिसंनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांकडून वाहन मालकांना नोटीस बजावल्यानंतर ४८ तासात वाहन न हलविल्यास थेट जप्त करण्यात येणार आहे.‘

शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते, तसेच प्रमुख रस्त्यांवर वाहने लावली जातात. वाहन लावल्यानंतर ती काढली जात नाही. धूळखात पडलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होती. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी बेवारस वाहने काढून घेण्याबाबत आवाहन केले होते. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अशा वाहनांविरुद्ध बुधवारपासून (१५ एप्रिल) कारवाई करण्यात येणार आहे’, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला.

‘बेवारस वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. बेवारस वाहनांचा शोध घेऊन संबंधित वाहन मालकाला नोटीस बजाविण्यात येणार आहे. नोटीस बजाविल्यानंतर २४ तासाच्या आत वाहन जागेवरुन न हलविल्यास ते बेवारस म्हणून घोषित करण्यात येईल. त्यानंतर ४८ तासात संबंधित वाहन जागेवरुन हलवून जप्त करण्यात येईल’, असे पोलीस उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.

दंडात्मक कारवाईनंतर वाहन परत

‘जप्त करण्यात आलेली बेवारस वाहनांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणा आहे. दंडात्म कारवाई करण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतर संबंधित वाहन परत दिले जाणार नाही. वाहन मालकांनी रस्त्यात बेशिस्तपणे लावलेली वाहने काढावीत. अशा प्रकाराच्या वाहनांची माहिती नागरिकांनी वाहतूक पोलिसांना पीटीपी ॲपच्या माध्यमातून कळवावी. ही माेहीम यशस्वी होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे’, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

बेवारस वाहनांचे छायाचित्र पाठविण्याचे आवाहन

‘शहरात रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने लावण्याचे प्रमाण मोठे आहे. या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अशा वाहनांची छायाचित्रे काढून पीटीपी ॲपच्या माध्यमातून पाठवावी. महापालिका आणि पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार आहे. बेवारस वाहने ठेवण्यासाठी महापालिकेने पंधरा ठिकाणे सुचविली आहेत. ही वाहने उचलून नेण्यासाठी टोईंग व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकतीच दिली होती.