पुणे : सायलेंन्सरमध्ये फेरफार करुन फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३४८ बुलेट चालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्या बुलेटला बसविण्यात आलेले सायलेन्सर जप्त करण्यात आले, पोलिसांनी बुलेट चालकांसह नियभभंग करणाऱ्या दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

शहराच्या वेगवेगळ्या भागात विशेषत: उपनगरात भरधाव वेगात बुलेट चालक जातात. काही बुलेट चालक सायलेंन्सरमध्ये फेरफार (माॅडीफाय) करतात. अशा प्रकारचे फेरफार केल्यानंतर सायलेन्सरमधून फटाक्यासारखे आवाज येतात. रात्री अपरात्री अशा प्रकाराच्या आवाजाचा नागरिकांना त्रास होतो. विशेषत : ज्येष्ठ नागरिकांना त्रासाला सामाेरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून आठवडभरापासून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. विरुद्ध दिशेने जाणे, ट्रिपल सीट, तसेच विविध प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांकडून एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सायलेन्सरमध्ये फेरफार करुन फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी दिवसभरात ३४८ बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करुन सायलेंन्सर जागेवरच काढून टाकले. वाहतूक पोलिसांनी हे सायलेन्सर जप्त केले. बुलेट चालकांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी १४८ दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून १५ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

मद्यपी वाहनचालकां विरुद्ध कारवाई

वाहतूक पोलिसांनी मद्य प्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन ५३ मद्यपी वाहन चालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले. या प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या ४४ आरोपींना न्यायालयाने चार लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यांच्याकडून त्वरीत दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.