पुणे : रात्री-अपरात्री फटाक्यासारखा आवाज काढणारे बुलेटचालक, कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. सायलेन्सरमध्ये फेरफार (माॅडिफिकेशन) करणाऱ्या २७४ दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून फेरफार केलेले सायलेन्सर बुलेटला बसविण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज येतो. दुचाकीस्वार कणकर्कश हाॅर्नचा वापर करतात. रात्री-अपरात्री उपनगरात फटाक्यांसारखा आवाज काढत बुलेटचालक जातात. अशा प्रकारच्या आवाजांमुळे नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणारे बुलेटचालक, तसेच कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. दुचाकीस्वार, बुलेटचालकांना फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.
सायलेन्सरमध्ये बेकायदा फेरफार करणारे दुचाकीचालक आणि गॅरेजचालकांविरुद्ध ‘ऑपरेशन माॅडिफिकेशन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात २७४ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
८४ सायलेन्सर जप्त
‘वाहतूक पोलिसांनी फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या दुचाकीचालकांचे सायलेन्सर काढून ते जप्त केले आहेत. पोलिसांनी ८४ सायलेन्सर जप्त केले आहेत. यापुढील काळात फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम यापुढील काळात सुरू राहणार आहे. दुचाकीस्वारांना वाहतूक नियमांचे पालन करावे’, असे आवाहन पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
