पुण्यातील टिळक चौकात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी चालक महिलेवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. एवढंच नाहीतर, आमच्या विरोधात जर तू तक्रार केलीस, तर तुझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार करू, अशी धमकी देखील आरोपी महिलेच्या पतीने दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संपत गुलाबराव करवंदे असे फिर्यादी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तर, सृष्टी राऊत, प्रेम राऊत, रोहन बाबासाहेब जावळे आणि शशिकला राऊत (सर्व राहणार शिवाजीनगर) अशी आरोपींची नावं आहेत. यातील प्रेम राऊत आणि रोहन जावळे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक कर्मचारी संपत करवंदे हे टिळक चौकात काल (१८ ऑगस्ट) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर होते. तर, केळकर रस्ता ते टिळक चौक हा मार्ग वाहतुकीसाठी एकेरी असताना देखील, आरोपी महिला सृष्टी राऊत ही तिच्या दुचाकी टिळक चौकाच्या दिशेने घेऊन आल्या. त्यावेळी तेथील चौकात असलेले वाहतूक कर्मचारी करवंदे यांनी त्यांना अडवले आणि ऑनलाईन दंड आकरला. यावरून सृष्टी राऊत हिने करवंदे सोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी देऊन तिथून निघून गेली. त्यानंतर काही वेळाने ती तिचा पती, भाऊ आणि आजी या तिघांना घेऊन आली आणि पुन्हा पोलिसासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करत, त्यांचा शर्ट देखील फाडला. तसेच, आरोपी महिलेचा पती प्रेम राऊत याने पोलिसाला, तू जर आमच्याविरोधात तक्रार दिली तर तुझ्या विरोधात माझ्या बायकोचा विनयभंग केल्याची तक्रार करेन, अशी धमकी देखील दिली.

या घटनेनंतर वाहतूक पोलिस कर्मचारी संपत गुलाबराव करवंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, प्रेम यशवंत राऊत, रोहन बाबासाहेब जावळे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.