Pune Traffic Police Challan : बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येते. कारवाई केल्यानंतर अनेकांनी थकीत दंड भरला नसल्याचे उघडकीस आले आहे. वाहनचालकांनी येत्या ३० दिवसांत थकीत दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) सादर करण्यात येणार आहे. थकीत दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मार्च २०१९ पासून ई-चलन सुविधेद्वारे बेशिस्त वाहनचालकांनी दंडात्मक कारवाईचे संदेश पाठविण्यास सुरुवात झाली. वाहतूक पोलिसांनी ई-चलन पाठविल्यनंतर अनेक वाहनचालकांनी दुर्लक्ष केले. थकीत दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले. मात्र, अनेक वाहनचालकांनी अद्याप थकीत दंड भरलेला नाही.

वाहनचालकांकडून थकीत दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात थकीत दंडाची वसुली करण्यासाटी पोलिसांकडून ही मोहीम प्रभावी पद्धतीने राबविण्यात येणार आहे. थकीत दंडाबाबतची नोटीस वाहनचालकांना पाठविण्यात येणा असून, संबंधित नोटीस मिळाल्यानंतर महिनाभरात ही रक्कम भरणे गरजेचे आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कायदेशीर कारवाईचा इशारा

थकीत दंड भरण्याबाबत वाहनचालकांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. दंड न भरल्यास वाहन परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) पाठविण्यात येणार आहे. या बाबत न्यायालयात खटलाही दाखल करण्यात येणार आहे. संबंधित नोटीस वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘MHPECH-G ’ या अधिकृत शॉर्ट कोडवरून मोबाइल संदेशाद्वारे (एसएमएस) पाठविण्यात येणार आहे. ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी २०२६ आणि १ मार्च २०२६ या कालावधीत पाठविण्यात येणार आहे. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने संदेश आल्यास तो संशयास्पद समजावा, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

दंड भरण्याची सुविधा

वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ’ https://mahatrafficechallan.gov.in’ भरावा. तसेच पुणे ट्रॅफिक पोलीस ॲप (पीटीपी ॲप) दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनचालकांनी जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलन यंत्राचा वापर करून क्यूआर कोड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करुन दंडाची रक्कम भरू शकतात.

थकीत दंडवसुली हा एकमेव उद्देश या मोहिमेमागचा नाही. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होतात. त्यांना शिस्त लावण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. – मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त.

एपीके फाईलकडे काणाडोळा करण्याचे आवाहन

‘वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा संदेश एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार नाही. एपीके फाईल पाठविल्यास अशा संदेशाकडे काणाडोळा करावा, नोटिशीत नमूद केलेल्या पेमेंट पद्धतीचा वापरा करावा. वाहनचालकांनी ओटीपी देऊ नये,’ असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.