पुणे : ‘नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाई तूर्तास स्थगित करून शहरातील कोंडी सोडविणे, वाहतूक नियमनावर लक्ष केंद्रीत करावे’, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाईसाठी वापरलेले जाणारे ई-चलन यंत्र पोलीस मुख्यालयात जमा करावेत, तसेच ई-चलन यंत्राद्वारे कारवाईचे अधिकार वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे राहणार आहेत.

‘पावसाळ्यात शहरातील वाहतुकीचा वेग संथ हाेतो. वाहतूक संथ झाल्यानंतर कोंडी होते. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत दंडात्मक कारवाई स्थगित करून वाहतूक नियमनावर लक्ष केंद्रीत करावे. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्या भागात कोंडी होते. अशा भागांत उपस्थित राहून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, कोंडीची कारणे शोधून काढावीत,’ असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.
‘वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी कोंडीची ठिकाणे निश्चित करून वाहतूक नियंत्रक दिव्यांची वेळ पाहावी. कोंडींच्या भागात वाहनांना थांबण्यास मज्जाव करावा,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

‘‘ब्लॅकस्पाॅट’ शोधावेत’

‘शहरात गंभीर, तसेच प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. शहर, तसेच उपनगरातील अपघातप्रवण भागाची (ब्लॅकस्पाॅट) पाहणी करावी. तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करावा, वाहतूक कोंडी, अपघातांची कारणे शोधून काढावीत,’ असे ते म्हणाले.

‘मद्यपींविरुद्ध कारवाई करा’

‘नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई तात्पुरती स्थगित करण्यत आली आहे. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू ठेवावी. वाहतूक पोलिसांनी शक्यतो बाॅडी कॅमेऱ्यांचा वापर करावा. कारवाई करताना गैारप्रकार होता कामा नये, याची काळजी घ्यावी. या कारवाईवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाणार आहे,’ असे आदेशात म्हटले आहे.

रात्रपाळीत विशेष पथके

रात्री मद्यप्राशन करून वाहने चालविण्याचे प्रकार घडतात. पुणे पोलिसांच्या सात परिमंडळात वाहतूक शाखेतील विशेष पथके रात्री गस्त घालणार आहेत. या पथकात अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत.

वाहतूक शाखेतील २०० नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण वाहतूक शाखेत नव्याने रूजू झालेल्या २०० पाेलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.