पुणे : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले. समाजमाध्यमातून चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात आली.
पोलीस हवालदार अंकुश रामा पवार, लक्ष्मण बालाजी रामगडे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावेा आहेत. पवार आणि रामगडे हे सहकारनगर वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. १९ एप्रिल रोजी दोघेजण शारदा आर्केड चौकात वाहतूक नियमन करत होते. सिग्नल मोडून निघालेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध ते कारवाई करत होते. कारवाई सुरू अशताना एका दुचाकीस्वाराने मोबाइलवरुन संबंधित घटनेचे चित्रीकरण करुन समाजमाध्यमात प्रसारित केले. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेतील अधिकााऱ्यांनी दोघांचे जबाब नोंदविले. वाहतूक नियमन करणारे पोलीस कर्मचारी पवार आणि रामगडे यांनी तीन वाहनचालकांकडून ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यात ५०० रुपये जमा करुन घेतल्याचे उघड झाले.
दंडात्मक कावराईऐवजी त्यांनी स्वत:च्या खात्यात पैसे जमा करुन घेतल्याचे उघड झाले. पवार आणि रामगडे यांचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदा आमि पोलीस दलाची प्रतिमा मलीन कणारे असल्याचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले.
घोळक्याने कारवाई
शहरातील प्रमुख चौक, तसेच रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमन करण्यास प्राधान्य देण्याऐवजी बऱ्याचदा वाहतूक पोलीस घोळक्याने थांबून कारवाई करतात. याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी घोळक्याने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचारी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
